‘डेटिंग’च्या डिक्शनरीतील या नव्या संकल्पना तुमच्या परिचयाच्या आहेत का?

dating
आजकालच्या पिढीसाठी ‘डेटिंग’ची कल्पना नवी नाही. मात्र या डेटिंग च्या विश्वामध्ये आणि खास डेटिंग साठी वापरल्या जाणाऱ्या शब्दसंग्रहामध्ये काही नवीन शब्दांची भर अलीकडच्या काळामध्ये पडलेली आहे. ‘इन्स्टा-ग्रँड-स्टँड’ हा लांबलचक शब्द सध्या डेटिंगच्या डिक्शनरी मध्ये समाविष्ट झाला असून, एखाद्या ‘खास’ व्यक्तीचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये त्या व्यक्तीचे लक्ष आपल्याकडे आकृष्ट होईल अशा पद्धतीच्या पोस्ट्स करणे, असा या शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे आपल्या अकाऊंटवर निरनिरळ्या रोचक ‘स्टोरीज’, किंवा छायाचित्रे पोस्ट करून आपण सध्या काय करीत आहे हे ‘त्या’ व्यक्तीला कळावे असा या मागील हेतू असतो. डेटिंगच्या डिक्शनरीमधील आणखी एक नवा शब्द म्हणजे ‘स्टॅशिंग’. एखाद्याला आपण ‘डेट’ करीत असून, त्याची खबर इतरांना न लागू देण्याला, म्हणजेच गुपचूप डेटिंग करण्याला ‘स्टॅशिंग’ म्हटले जाते.

एखाद्याच्या संपर्कातून, काही वादविवाद, मतभेद किंवा तत्सम काही कारणाने अचानक गायब होऊन जाण्याला ‘घोस्टिंग’ म्हटले जाते, तर कोणत्याही कारणाशिवाय, सर्व काही व्यवस्थित असतानाही अचानक संपर्कातून निघून जाण्याला ‘कॅस्परिंग’ म्हटले जाते. मात्र एखाद्याशी आपण होऊन काही कारणाने संपर्क कमी केला असल्यास किंवा प्रेमसंबंध संपुष्टात आले असतानाही त्यांच्या पोस्ट्स सोशल मिडीयावर दिसत राहण्याला ‘हॉन्टिंग’ म्हटले जाते !

आपल्याला जी व्यक्ती आवडते तिच्याशी अंमळ जास्तच आपुलकीने वागण्याला ‘केकिंग’ म्हटले जाते. केकिंग करणाऱ्या व्यक्ती आपल्या ‘डेट’ ला नेहमीच प्रेमभरे मेसेज पाठवत असतात. अशा व्यक्ती आपल्या ‘डेट’ व्यतिरिक्त इतर कोणाकडेही ढुंकून देखील पाहत नाहीत. काही व्यक्तींवर मात्र आपल्या ‘डेट’चा प्रभाव इतका जास्त असतो, की त्यांच्या जोडीदाराने त्यांना कितीही अपमानास्पद वागणूक दिली, तरीही या व्यक्तींच्या मनामध्ये आपल्या जोडीदाराविषयी असलेले प्रेम यत्किंचितही कमी होत नाही. यालाचा डेटिंगच्या डिक्शनरीमध्ये ‘बर्ड बॉक्सिंग’ म्हटले गेले आहे.

Leave a Comment