आजकाल बॉलीवूड सेलिब्रिटीजचे ‘एअरपोर्ट लुक्स’ वेळोवेळी व्हायरल होत असतात. व्हीआयपी स्टेटस असणारे, सुरक्षा कर्मचारीदलाच्या कोंडाळ्यामध्ये विमानापर्यंत पोहोचणारे आणि विमानामध्ये एक्झिक्युटिव्ह क्लासने प्रवास करीत असल्याने बहुतेकवेळी आपल्या विमानामध्ये कोणी सेलिब्रिटी आहे याची गंधवार्ताही इकोनॉमी क्लासमधील प्रवाश्यांना नसते. मात्र अलीकडे अभिनेता आमिर खानने मात्र इकोनॉमी क्लासने प्रवास केल्याने त्याच विमानाने प्रवास करणाऱ्या इतर प्रवाश्यांना मात्र आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आमिर, सर्वसामान्य प्रवाश्यांच्या प्रमाणे इकोनोमी क्लासने प्रवास करीत असलेला व्हिडियो सोशल मिडीयावर देखील व्हायरल झाला आहे.
आमिर खानला विमानाच्या इकोनॉमी क्लासमध्ये पाहून प्रवाश्यांना आश्चर्याचा धक्का
या व्हिडियोमध्ये पांढरी कॅप, चष्मा आणि गडद निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला आमिर पहावयास मिळत आहे. तसेच बॉलीवूडच्या इतक्या मोठ्या सुपरस्टारला प्रत्यक्षात पहावयास मिळाल्याचा आनंद इतर प्रवाश्यांच्या चेहऱ्यावरही स्पष्ट पहावयास मिळत आहे. आता आमिर त्याच्या आगामी ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त झाला असून, हा चित्रपट अतिशय गाजलेल्या हॉलीवूड चित्रपट ‘फोरेस गंप’ या चित्रपटावर आधारित आहे. हॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते टॉम हँक्स यांची या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका होती.
आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा आमिरने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली असून, आमिर खान प्रोडक्शन्स आणि व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्सच्या वतीने या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करणार असून, या चित्रपटामध्ये आमिर ‘लाल सिंह चढ्ढा’च्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. आमिरसोबत पूर्वी काम केलेला अभिनेता शर्मन जोशी या चित्रपटामध्ये आमिरसोबत पुन्हा एकदा दिसणार आहे. या पूर्वी आमिर अभिनीत ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, सना फातिमा शेख, अशी भारदस्त स्टारकास्ट असूनही बॉक्स ऑफिसवर सपशेल पडला होता.