ट्रम्प म्हणाले श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांत मारले गेले ‘१३८ मिलियन’ लोक

donald-trump
वॉशिंग्टन – ईस्टर संडेदिवशी श्रीलंकेत कोलंबोतील चर्चमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. आता २९० वर या स्फोटांमध्ये मृतांचा आकडा पोहोचला असून या घटनेनंतर शोक व्यक्त करताना आपल्या ट्विटमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोडचूक केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘१३८ मिलियन’ लोक मारले गेल्याचा उल्लेख केला आहे. पण श्रीलंकेची लोकसंख्याही १३८ मिलियन (दशलक्ष) एवढी नसल्यामुळे ट्रम्प यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. नंतर हे ट्विट डीलिट करण्यात आले.

ट्रम्प हे नेहमीच आपल्या विक्षिप्त ट्विटस आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. २९० लोक मृत आणि ५०० लोक कोलंबोतील बॉम्बस्फोटांमध्ये जखमी झाल्याने अत्यंत गंभीर आणि दुःखद वातावरण आहे. थोडीफार आकड्यांमध्ये तफावत होणे शक्य आहे. पण अमेरिकेसारख्या देशाच्या अध्यक्षाने या स्थितीत अशा प्रकारची उथळपणा दाखवून देणारी चूक अक्षम्य ठरते. यामुळे ट्रम्प यांना टीकेचा सामना करावा लागला. तसेच, सोशल मीडियावर त्यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली.

श्रीलंकेची लोकसंख्या २०१७ मध्ये २१.४४ मिलियन (दशलक्ष) होती,’ याची वस्तुस्थितीची एका ट्विटर युजरने ट्रम्प यांना आठवण करून दिली. तर, दुसऱ्या एका युजरने श्रीलंकेतील घटना दुःखद आहे. मात्र १३८ दशलक्ष लोक मृत्यू पावलेले नाहीत. कारण तेथे विनाशकारी अणुबॉम्बचा स्फोट झालेला नाही, अशी कोपरखळी मारली. यानंतर ट्रम्प यांचे मूळ ट्विट काढून घेण्यात आले. तसेच, नव्याने सुधारित ट्विटही करण्यात आले.

Leave a Comment