इंदूरमधून सुमित्रा महाजनऐवजी शंकर लालवानी यांना भाजपची उमेदवारी

shankar-lalwani
भोपाळ – भाजपने इंदूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली आहे. सुमित्रा महाजन यांच्याऐवजी या जागेवरून शंकर लालवानी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, तर भाजपने दिल्लीतील ३ जागांवरही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दिल्ली भाजपाध्यक्ष मनोज तिवारी यांना त्यामध्ये उत्तर दिल्लीमधून रिंगणात उतरवले आहे.

इंदूर लोकसभा मतदारसंघाचा पेच मागील अनेक दिवसांपासून फसला होता. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी या मतदारसंघातून अनेकवेळा निवडणूक जिंकली आहे. त्यांनाच यावेळीही उमेदवारी मिळेल, असा अंदाज लावण्यात येत होता. पण आता येथून शंकर लालवानी यांना भाजपने मैदानात उतरवले असल्यामुळे येथील संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.

इंदूर मतदारसंघातून उमेदवार घोषित न केल्यामुळे मध्यंतरी सुमित्रा महाजन यांनी पक्षाध्यक्ष अमित शाहंना पत्र लिहिले होते. त्यावरुन लवकरात लवकर या जागेवर उमेदवार घोषित करावा अशी मागणीही केली होती. त्यांची ही हाक पक्षाने खूप वेळानंतर ऐकलेली दिसते.

याव्यतिरिक्त दिल्लीच्या चांदणी चौक येथून केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना उमेदवारी दिली आहे. तर उत्तर दिल्लीतून मनोज तिवारी आणि पश्चिम दिल्लीतून प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तसेच उत्तर प्रदेशातील घोसी या जागेवर हरिनारायण राजभर आणि अमृतसर येथून हरदीप पुरी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

Leave a Comment