टिक टॉकला सर्वोच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

tiktok
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ‘टिक टॉक’ अॅपवर बंदी घालण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली. मद्रास उच्च न्यायालयाने २४ एप्रिल रोजी टिक टॉक संदर्भातील वादावर सुनावणी घ्यावी किंवा प्रकरण निकाली काढावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ‘टिक टॉक’ कंपनीतर्फे सर्वोच्च न्यायालयात या सुनावणीत बाजू मांडण्यात आली असून कंपनीचे दररोज साडे चार कोटी रुपयांचे नुकसान बंदीमुळे झाल्याचे म्हटले आहे.

मद्रास उच्च न्यायालयात टिक टॉक अॅपचा गैरवापर होत असल्याने त्यावर बंदी आणावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल झाली होती. मद्रास उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणीदरम्यान टिक टॉक अॅपवर बंदी टाकली होती. गुगल आणि अॅपल या कंपन्यांना केंद्र सरकारनेही टिक टॉक अॅप डिलीट करण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयात या आदेशाविरोधात याचिका दाखल झाली होती.

सोमवारी झालेल्या सुनावणीत टिक टॉक कंपनीतर्फे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आली. मद्रास उच्च न्यायालयाने आमची बाजू न ऐकताच बंदी टाकल्याचे कंपनीने सांगितले. तसेच या बंदीमुळे दररोज ४. ५ कोटी रुपयांचे नुकसान होत असून २ मिलियन युजर्सचे प्रोफाइल आणि सुरक्षा पणाला लागली आहे, असेही कंपनीने सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी तात्पुरती उठवत कंपनीला दिलासा दिला आहे.

Leave a Comment