ताणतणाव – दरवर्षी 28 लाख बळी घेणारा शत्रू!

stress
सध्याच्या स्पर्धेच्या युगात तणाव हा सर्वांनाच जाणवतो. लहान मुले, तरुण, पुरुष, महिला, तसेच वृध्दांनाही तणावाला सामारे जावे लागत आहे. तरूणांमध्ये तर तणावाचे प्रमाण खूप असल्याचे दिसून येते. सध्याचे जीवन अत्यंत धावपळीचे, दगदगीचे आणि ताणतणावाचे झालेले आहे, हे आपण नेहमी ऐकतो. मात्र त्याचा नेमका परिणाम काय होतो किंवा त्याची व्याप्ती किती आहे, हे आपल्याला सहसा कळत नाही. संयुक्त राष्ट्रसंघाची कामगार संघटना असलेल्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) या संबंधात जारी केलेली आकडेवारी डोळे उघडायला लावणारी आहे.
ताणतणाव, जास्त वेळ काम करणारे आणि रोगराई यामुळे दरवर्षी जवळजवळ 28 लाख कामगार मृत्यूमुखी पडतात, तर कामाशी निगडीत कामामुळे सुमारे 37 कोटी 40 लाख लोक जखमी होतात किंवा आजारी पडतात, आयएलओने म्हटले आहे.

आयएलओचा ताजा अहवाल गुरुवारी प्रकाशित झाला त्यात ही माहिती देण्यात आली आहे. आयएलओचे हे शताब्दी वर्ष असून येत्या 28 एप्रिल रोजी कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्य दिवस आहे. त्यानिमित्ताने हा अहवाल जारी करण्यात आला आहे. मोबदला मिळणाऱ्या कोणत्याही कामामुळे तुमच्या स्वास्थ्य, सुरक्षितता किंवा जीवनावर परिणाम होता कामा नये, असा संदेश या अहवालातून देण्यात आला आहे. यात अनेक नवीन किंवा विद्यमान व्यावसायिक जोखमी निश्चित केल्या आहेत आणि त्यांचा असर पुरुषांपेक्षा स्त्रियांवर अधिक होतो, हेही सांगितले आहे. यामध्ये एकूणच आधुनिक जीवनातील बाबी, जागतिक लोकसंख्या वाढ वाढती डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि हवामानातील बदल यांचा समावेश आहे. या सर्वांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे सुमारे चार टक्के नुकसान होत असल्याचा आयएलओचा अंदाज आहे.

“कामाचे जग बदलले आहे. आपण वेगळ्या पद्धतीने काम करीत आहोतय आपण जास्त वेळ काम करत आहोत आणि आपण अधिक तंत्रज्ञान वापरत आहोत,” असे आयएलओचे मॅनल अझ्झी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वृत्तसंस्थेला सांगितले.

अहवालात असे म्हटले आहे, की 36 टक्के कामगार जास्त वेळ काम करीत आहेत म्हणजेच प्रत्येक आठवड्यात 48 तासांपेक्षा अधिक तास काम करत आहेत. लोकांना अधिकाधिक प्रमाणात उत्पादन करण्यास सांगण्यात येत आहे आणि त्यांना विश्रांती करायलाही वेळ मिळत नाही.

अझ्झी यांच्या म्हणण्यानुसार, याचा फटका खासकरून महिलांना बसत आहे कारण मुलांची किंवा घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळे त्यांना व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्या कार्यालयात तर काम करतातच पण घरी असतानाही काम करतात. म्हणूनच हे खूप थकवा आणणारे काम ठरते आणि हृदयरोगावरील रोगांवरही याचा परिणाम होतो.

आयएलओच्या अहवालातील माहितीनुसार, कामाच्या संदर्भातून मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण रोगामुळे असून त्याचे प्रमाण 86 टक्के आहे. सुमारे 6,500 लोक रोज आपल्या कामातून होणाऱ्या आजारांमुळे मरण पावतात, तर कामावरील अपघातात 1000 जण मरण पावतात. मृत्युदरांचे सर्वात मोठे कारण म्हणजे रक्तसंक्रमण रोग (31 टक्के), कामाशी संबंधित कर्करोग (26 टक्के) आणि श्वसनाचे रोग (17 टक्के). अशा मृत्यूंमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीसोबतच त्यामुळे होणाऱ्या अपरिमित मानवी शोकांतिकाही आपण जाणून घेतली पाहिजे. हे अधिक त्रासदायक आहेत कारण आपण ते टाळू शकतो, असे अझ्झी म्हणाल्या.

राष्ट्रसंघाचा हा अहवाल आपल्याकडे केलेल्या संशोधनाला अनुरूपच आहे. असोचेम हेल्थकेअर समितीने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या अहवालानुसार, कॉर्पोरेट जगतात कामाची चिंता आणि कर्मचार्‍यांना दिले जाणारे लक्ष्य इतके उच्च असते की सुमारे 56 टक्के कर्मचारी सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात. भारतीय श्रमशक्तीचा सुमारे 46 टक्के हिस्सा तणावाखाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

कामकाजाचे ओझे हे तर त्यामागील कारण आहेच, परंतु कार्यालयातील कामाचा ताण सतत बाळगणे हेही त्याचे कारण आहे. कामाच्या अतिरिक्त तणावामुळे कर्मचार्‍यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता आणि नैराश्यासारखे आजार जडत आहेत, असे असोचेमच्या अहवालात म्हटले आहे.
थोडक्यात म्हणजे कामाशी निगडीत ताणतणाव हा कर्मचारी व कामगारांचा सर्वात मोठ्या शत्रू म्हणून पुढे येत आहे. त्याच्याशी दोन हात करणे हेच आपल्यापुढेच सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.

Leave a Comment