नोत्रे-दामची पुनर्बांधणी का गरिबांची पोटे – फ्रान्सपुढील पेच

france
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील जगप्रसिद्ध नोत्रे-दाम कॅथेड्रल या ऐतिहासिक चर्चला गेल्या आठवड्यात भीषण आग लागली. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या चर्चचे यामुळे मोठे नुकसान झाले. या आगीत चर्चच्या छताचा 85० वर्ष जुना भाग जळून खाक झाला. युनेस्कोने या चर्चला जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेले आहे. बाराव्या शतकातील हे चर्च म्हणजे फ्रान्सच्या मानबिंदूपैकी एक. म्हणूनच या आगीच्या घटनेनंतर फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्यूअल मॅक्रॉन यांनी नोत्रे-दाम कॅथेड्रलची पुनर्बांधणी करणार असल्याचे जाहीर केले होते.

मात्र याच पुनर्बांधणीवरून आता फ्रान्समध्ये दोन तट पडले आहेत. फ्रान्समधील काही बलाढ्य कंपन्या आणि अब्जाधीश व्यक्तींनी या चर्चच्या बांधकामासाठी मदत देण्याची तयारी दाखवली आहे. चर्चच्या पुनर्बांधणीसाठी केवळ 48 तासांत 78 हजार कोटी रुपये उभारण्यात आले. भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या मालकीच्या आर्सेलर मित्तल या कंपनीने चर्चच्या बांधकामासाठी स्टील उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. तेलसम्राट पॅट्रिक पॉएन, केरिंग ग्रुप, लॉरियल व वॉल्ट डिस्ने यांनी चर्चसाठी 2400 कोटी रुपये देण्याची घोषणा केली.

फ्रान्स्वा हेन्री पिनॉ आणि बर्नार्ड अर्नॉल्ट यांसारख्या काही उद्योगपतींनी तर 10 कोटी युरो देऊ केले आहेत. मात्र यावरून नवीन वाद निर्माण झाला असून हा पैसा अधिक चांगल्या कामांसाठी वापरावा असे अनेकांचे म्हणणे आहे.

फ्रान्समध्ये गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात अनेक निदर्शने झाली होती. यलो वेस्ट चळवळ असे या निदर्शनांना नाव देण्यात आले आहे. मागील वर्षापासून यलो वेस्ट निदर्शक पॅरिसच्या रस्त्यांवर निदर्शने करत असून त्याला अनेकदा हिंसक वळण लागले आहे. इंधनाच्या वाढत्या दरांच्या विरोधात हे आंदोलन सुरू झाले होते मात्र त्याचा मुख्य भर देशातील वाढत्या आर्थिक विषमतेवर होते. निदर्शकांनी पिवळय़ा रंगाचे जॅकेट परिधान केल्याने या आंदोलनाला यलो वेस्ट नाव पडले.निवृत्तीवेतन द्यावे, शिक्षणावरील सरकारी खर्चात वाढ करावी, कराचे दर कमी करावेत, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करावी, स्थलांतरितांचे प्रमाण कमी करावे आणि सरकारी सेवांचे खासगीकरण रद्द करावे, अशी या निदर्शकांची मागणी होती. ती आजही कायम आहे.

आज याच निदर्शकांकडून या उद्योगपतींनी व कंपन्यांनी चर्चच्या उभारणीसाठी मोठ्या रकम देऊ करण्याला विरोध केला आहे. या देणीदारांनी केवळ आपले कर भरले आणि ‘मानवी कॅथेड्रल’ची जपणूक केली तर अधिक सांस्कृतिक योगदान होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. “नोत्रे-दाम बांधण्यासाठी ते कोट्यवधी रुपये देऊ शकतात, तर सामाजिक सेवांसाठी पैसे नाहीत असे आम्हाला सांगणे त्यांनी बंद करावे,” असे सीजीटी या कामगार संघटनेचे नेते फिलिप मार्टिनेझ यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

विशेष म्हणजे या धनाढ्य व्यक्तींनी दिलेल्या देणगीवरही कर माफ करण्यात येतो. त्यामुळे तर विरोधकांचा पारा आणखी चढला आहे. म्हणूनच आपल्या देणगीवर मिळणारी करातील सूट न घेण्याची घोषणा पिनॉ यांनी केली.

स्वीडनमधील किशोरवयीन पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग हिनेही या वादात उडी घेतली. पर्यावरण हाच आपल्या प्राधान्याचा मुद्दा असायला हवा, असे तिने म्हटले. “ नोत्रे-दामचे बांधकाम पुन्हा होईल, त्याचा पाया मजबूत असेल अशी मला आशा आहे. आपला पाया त्याहूनही मजबूत असले, अशी आशा मला आहे, मात्र ते तसे नाहीत अशी भीती मला वाटते,” असे तिने या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी युरोपीय संसदेसमोर बोलताना सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री फ्रँक रिस्तर यांनी मात्र या विरोधाची खिल्ली उडवली आहे. सामाजिक व्यवस्थांसाठी आणि आरोग्यासाठी पैशांची गरज आहेच, मात्र तिथे जास्त गरज असल्यामुळे नोत्रे-दामच्या बांधणीसाठी पैसे देऊ नयेत, असे म्हणणे मूर्खपणाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ही केवळ दगडांची इमारत नाही. ती आमच्या ओळखीचा, आमच्या राष्ट्राचा आणि युरोपीय संस्कृतीचा भाग आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
नोत्रे-दाम चर्चची उभारणी 1163 ते 1345 दरम्यान करण्यात आली होती. या चर्चला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. फ्रेंच सम्राट नेपोलिअन बोनापार्टचा राज्याभिषेकही याच चर्चमध्ये झाला होता. युनेस्कोने 1991 या चर्चचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला होता.

Leave a Comment