मोदी आणि पवार – धुमश्चक्री की दिलजमाई?

combo
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात होणाऱ्या सभांमध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही शरद पवारांना जास्त लक्ष्य करण्यात येत आहे. मोदी आपल्या सर्व भाषणांमध्ये पवार यांचे नाव घेत आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आश्चर्यचकित झाले आहेत. म्हणूनच या दोघांमध्ये नक्की काय शिजतेय, याचाच अंदाज येईनासा झालाय. या दोन पक्षांमध्ये धुमश्चक्री पाहण्याची अपेक्षा असणाऱ्यांना दिलजमाई पाहायला मिळत आहे.

भाजपच्या वतीने 2014 मधील निवडणुकीत सिंचन गैरव्यवहाराचे प्रकरण काढण्यात आले होते. त्यावेळी या गैरव्यवहारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासकरून अजित पवार जबाबदार असल्याचा प्रचार भाजपच्या वतीने करण्यात येत होता. मात्र यावेळेस मोदी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा केवळ दोनदा उल्लेख केला. पहिला होता गोंदियात. तिथे त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा नामोल्लेख टाळून त्यांना हुडहुडी भरत असल्याची टीका केली होती. दुसऱ्या सभेत त्यांनी सिंचन गैरव्यवहारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सामील असल्याचा आरोप त्यांनी केला. माढा मतदारसंघात प्रत्यक्ष शरद पवारांच्याच उमेदवारीची बाब समाविष्ट असल्यामुळे अकलूजच्या सभेत पवारांवर त्यांनी लाजेकाजेस्तव टीका केली.

मात्र मोदी यांनी पवारांवर आतापर्यंतची जी सर्वात मोठी टीका केली ती भ्रप्टाचारावरून नव्हती तर त्यांच्या कौटुंबिक भांडणाबद्दल होती. अजित पवार यांच्याशी मतभेद असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बेजार झाल्याचे त्यांनी म्हटले होते. सांगायचा मुद्दा असा, की भ्रष्टाचारावरून पवारांना घेरण्याऐवजी मोदी यांनी ते अद्याप काँग्रेससोबत का आहेत, असा प्रश्न केला आहे. लातूर येथील सभेत बोलताना ते म्हणाले, की देशाचे तुकडे करणाऱ्या काँग्रेससारख्या पक्षासोबत पवार अद्याप का आहेत?’ जणू पवारांनी काँग्रेसची साथ सोडून आपल्यासोबत यावे, अशी हाक ते घालत असावेत.

नगर येथील सभेतही त्यांनी पवारांना चुचकारण्याचाच प्रयत्न केला. ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्याचा हवाला देऊन ते म्हणाले, की ”जम्मू-काश्मिरमधून एका देशात दोन पंतप्रधान असल्याची भाषा करण्यात येते तेव्हा तुम्ही गप्प कसे काय बसू शकता? काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर तुम्ही या देशाकडे परकीयांच्या नजरेने पाहत आहात.” पवारांशी असलेल्या कदाचित याच जवळीकीमुळे मोदी यांनी 10 एप्रिल रोजी असलेली बारामती येथील सभा रद्द केली. या सर्वातून मोदी आणि पवार यांचे सूत जमले असल्याचा संशय नक्की येतो.

मोदी पंतप्रधान झाल्यापासून पवार यांनी वारंवार दिल्लीत त्यांची भेट घेतली. पवारांच्या निमंत्रणावरून मोदींनी दोनदा महाराष्ट्राचा दौरा केला. या दोन्ही दौऱ्यांत त्यांनी पवारांवर स्तुतिसुमने उधळली. शरद पवारांचा दिल्लीत झालेल्या अमृतमहोत्सवी सोहळ्यातही मोदींनी पवारांचे गुणगान गायले. खासकरून शरद पवारांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवलं, हे तीन वर्षांपूर्वी त्यांनी उच्चारलेले वाक्य लोक अजूनही विसरलेले नाहीत.
याचे एक कारण म्हणजे महाराष्ट्रात सक्षम काँग्रेस नेत्यांचा अभाव आणि दुसरे म्हणजे पवारांशी तडजोड करून पुढची बेगमी करण्याचे धोरण.

राष्ट्रवादीला 2014 मध्ये भले चारच जागा मिळाल्या असतील, परंतु या निवडणुकीत पक्षाच्या जागा वाढण्याचा अंदाज आहे, असे भाजप नेत्यांना वाटते. एका अंदाजानुसार, राष्ट्रवादीला यंदा नऊ जागा मिळतील. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही तर राष्ट्रवादीसोबतच्या संबंधांचा फायदा होऊ शकतो, असे भाजप नेत्यांचे मत आहे.

त्यामुळेच अकलूज येथील सभेत मोदींनी पवारांवर केलेली टीका आणि पवारांनी त्याला दिलेले उत्तर हे लुटुपुटूचे आहेत की काय, असे वाटते. त्यातून मोदींनी दोन संदेश दिले आहेत. एकीकडे महाराष्ट्रात काँग्रेसकडे नाव घेऊन टीका करण्यासारखे नेतेही नाहीत, हे त्यांनी एकामागोमागच्या सभेत दाखवून दिले. यामुळे पवारांचा अहंकार तर सुखावतो. शिवाय पवारांना वारंवार डिवचून ते काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट पाडण्याचाही प्रयत्न करत आहेत. भाजपच्या नेत्यांच्या आणि काही राजकीय निरीक्षकांच्या अंदाजाप्रमाणे पुढेमागे जागा कमी पडल्याच तर पवारांना जवळ घेता यावे, याचीही त्यातून तजवीज होते. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला मागितलेला नसतानाही पवारांनी पाठिंबा देऊ केला होता, हे लोक अद्याप विसरले नाहीत.
अर्थात मोदी आणि पवार हे दोघेही पोचलेले राजकारणी असल्यामुळे त्यांच्या मनात काय आहे, याचा मागमूसही ते लागू देणार नाहीत. या दोन तथाकथित गुरु-शिष्यांची पुढची चाल काय असेल, हे कळण्यासाठी 23 मेचीच वाट पाहावी लागणार!

Leave a Comment