प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सोडली काँग्रेसची साथ

priyanka-chaturvedi
नवी दिल्ली – काँग्रेसला लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठा झटका बसला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसच्या प्रवक्त्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. आता प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी काही दिवसांपूर्वी पक्षात महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना प्राधान्य दिले जात असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी याबद्दल एक ट्विट केले आहे. त्यांनी यात काँग्रेसच्या ट्विटर हँडललादेखील टॅग केले होते. यामुळे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली होती.

मेहनत करुन काही माणसे पक्षात आपले स्थान निर्माण करतात. पण पक्षात त्यांच्याऐवजी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या मंडळींना प्राधान्य दिले जात असल्याचे चतुर्वेदी यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. पक्षासाठी मी टीकेचा सामना केला. दगड झेलले. पण तरीही उलट पक्षाच्या नेत्यांनीच मला धमक्या दिल्या. जे लोक मला धमक्या देत होते, ते वाचले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हणत चतुर्वेदी यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भातील एक पत्रदेखील त्यांनी रिट्विट केले होते.

Leave a Comment