मायावतींच्या कार्यकर्त्याने चुकीचे बटन दाबले म्हणून कापले स्वत:चे बोट

BSP
बुलंदशहर – काल लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडला. काल देशभरातील ९५ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. या ९५ मतदारसंघांमध्ये उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर मतदारसंघाचाही समावेश होता. पण या मतदारसंघातील एका तरुणाने भाजपला चुकून मत दिल्यामुळे आपले बोट कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसप ऐवजी चुकून भाजपसमोरील बटन दाबल्याने मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता असणाऱ्या या तरुणाचे मत भाजप उमेदवाराला गेले म्हणून तो निराश झाला होता.

बुलंदशहरमध्ये भाजप खासदार भोला सिंग आणि सपा-बसपा-राजद युतीचे योगेश वर्मा यांच्यामध्ये थेट लढत रंगली आहे. बसपचा समर्थक असणाऱ्या पवन कुमार नावाच्या २५ वर्षीय तरुणानेही काल झालेल्या मतदानामध्ये मतदान केले. शिक्रापूर येथील अब्दुल्लापूर हुलासन गावात राहणाऱ्या पवनला वर्मा यांना मतदान करायचे होते पण चुकून त्याने सिंग यांच्या नावासमोरचे बटन दाबले. पण त्याचे मत चूक लक्षात येईपर्यंत नोंदवले गेले होते.

पवन मतदान करताना झालेल्या या चुकीमुळे स्वत:वरच खूप संतापला. त्याने मतदान करुन घरी आल्यानंतर रागाच्या भरात स्वत:चे बोट कापले. एक व्हिडिओ ट्विटवर पवन याने पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली. मी स्वत:चे बोट माझ्याकडून झालेल्या चुकीसाठी कापल्याचे पवनने सांगितले आहे. हत्तीच्या चित्रासमोरील बटन दाबण्याऐवजी कमळामच्या फुलासमोरील बटन दाबल्याने मी माझे बोट कापून घेतल्याचे पवनने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Comment