व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉट काढण्यावर बंदी घालण्याच्या तयारीत

whatsapp
मुंबई : खोटे पाडणाऱ्या आपल्या मित्रांसमोर खरेपणाचे पुरावे देण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट तुम्ही काढत होता का? किंवा आपल्याला आपल्या क्रशने प्रेमाचे कसे मेसेज पाठवले, याची फुशारकी मित्रांसमोर मारण्यासाठी तिच्या चॅटचे तुम्ही स्क्रीनशॉट पाठवत होता का? मग यापुढे असे तुम्हाला करता येणार नाही. कारण लवकरच स्क्रीनशॉट काढण्यावर बंदी घालण्याच्या तयारीत व्हॉट्सअॅप आहे.

हे अपडेट गूगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅप बीटा अपडेटमध्ये पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉटबंदीसोबतच अँड्रॉईड फोनसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन लागू करण्याचीही तयारी करत आहे. या फीचरचे नाव ‘फिंगरप्रिंट सिक्युरिटी’ असे आहे. व्हॉट्सअॅपकडून ही पावले गोपनीयता वाढवण्यासाठी उचलण्यात येत आहेत.

फेस आयडी/टच आयडी रेकग्निशननेच व्हॉट्सअॅप सध्या आयफोनधारकांना वापरावे लागते. पण तूर्तास आयफोनमध्ये स्क्रीनशॉटबंदी घालण्यात आलेली नाही. हे फीचर अँड्रॉईडधारकांना अपडेट झाल्यानंतर याविषयी सुस्पष्टता येईल. तुम्हाला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा ऑप्शन पाहावयचा असेल तर सेटिंग्ज > अकाऊण्ट > प्रायव्हसी चेक करावे लागेल. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅप ऑटोमॅटिकली लॉक करण्यासाठी एक मिनिट, दहा मिनिटे, तीस मिनिटे किंवा लगेच असे पर्याय असतील. फिंगरप्रिंट चुकीचे असले किंवा अनेक वेळा चुकीचे प्रयत्न झाले, तर व्हॉट्सअॅप काही मिनिटांसाठी लॉक होईल.

Leave a Comment