व्हायरल होत आहे सुप्रिया सुळेंची राहुल शेवाळेंना धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप

rahul-shewale
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या राहुल शेवाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या कथित ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा तो संबंधित कार्यकर्ता होता. पण पक्षाला रामराम ठोकत त्याने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने वर्तमानपत्रात दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात सुप्रिया सुळे त्याला जाब विचारत असल्याचे या फोन रेकॉर्डिंगमध्ये रेकॉर्ड झाले आहे. सुप्रिया सुळे या फोन रेकॉर्डिंगमध्ये राहुल शेवाळे नावाच्या या व्यक्तीला तुम्ही आमची बदनामी का करत आहात, अशी विचारणा करतात. तसेच, एक प्रामाणिक स्त्री मी आहे, माझ्या नादाला लागू नका. जर लागलात तर काय करायचे ते तिथे येऊन करेल. अशा आशयाचे संभाषण त्यात रेकॉर्ड झाले आहे. सध्या सर्वत्र या सगळ्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

राहुल शेवाळे यांनी याबाबत, बोलताना सांगितले की, सुप्रिया सुळे या माझ्यावर मी पक्ष सोडल्यामुळे नाराज असून मला त्यांनी धमकी दिल्याचे म्हटले आहे. राहुल शेवाळेंनी तुला बघुन घेऊ, माझ्या नादाला लागू नको अशी धमकी दिल्याचेही सांगितले. पण पवार कुटुंबियांवर मी कधीही टीका केली नाही. वर्तमानपत्रात माझ्या पक्षांतराची बातमी आली आहे. त्यांना त्याची सल असावी. मला अज्ञात लोकांचे आता फोन येत आहेत. मुख्यमंत्र्यांशी याबाबत माझी चर्चा झाली आहे. पण पुढे काय करायचे ठरवले नसल्याचेही राहुल शेवाळेंनी सांगितले.

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, माझ्या विरोधात हे षडयंत्र असून राहुल शेवाळेंच्या विरोधात मी अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. अवघ्या तीन दिवसांवर निवडणुक आली असतांना अशा पद्धतीने माझ्यावर आरोप केला जात आहे. अनेक जण आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेले आहेत. ते काही एकटेच नाहीत. मी एक महिला आहे. म्हणून अशा पद्धतीचे घाण राजकारण केले जात असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. जर मी धमकी दिली असेल, तर त्यांनी माध्यमांकडे जाण्याची गरजच नव्हती. पोलीस स्टेशनला ते थेट का गेले नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Leave a Comment