पुणेकर उमेदवाराचा आगळावेगळा प्रचार

anand-vanajpe
पुणे – आता अवघ्या काही दिवसांवर लोकसभा मतदार संघाची निवडणूक येऊन ठेपली असल्यामुळे प्रचाराची रणधुमाळी पुणे जिल्ह्यात जोरात सुरू आहे. जोरदार प्रचार आघाडी आणि युतीच्या उमेदवारांकडुन सुरू असून पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते, गाड्यांचा लवाजमा यासह मतदारांना सामोरे जाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे एका वेगळ्याच रितीने पुण्यातील अपक्ष उमेदवार आनंद वांजपे यांनी प्रचार सुरू केला आहे. ते शहरात सायकलवर फिरून एकटेच स्वतःचा प्रचार करत आहेत.

याबाबत आनंद वांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आॅस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातून त्यांनी ऍडव्हान्स डिप्लोमा अँड प्रिंटिंग टेक्नॉलॉजी या विषयात पदवी प्राप्त केली आहे. ते लोकसभेला पुण्यातून ‘किटली’ या चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. आनंद वांजपे हे ‘प्रदुषण मुक्त पुणे आणि आरोग्य संपन्न पुणे’ अशी पाटी लावुन निवडणुकीचा आणि प्रदुषण मुक्तीचा सगळीकडे प्रसार करत आहेत.

वांजपे निवडणुकीला प्रदूषण आणि वाहतूक हे दोन प्रश्न घेऊन सामोरे जात आहेत. वांजपे म्हणतात, अनेक उमेदवार आतापर्यत निवडून आले पण शहराच्या या दोन मुख्य प्रश्नाकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले असल्यामुळे मागील आठ वर्षांपासून सायकलवर फिरत याविषयावर नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. हे प्रश्न खासदार होऊन तरी सोडवता येतील, त्यामुळे निवडणुकीला उभा आहे.

आनंद वांजपे पुढे म्हणतात, मला प्रदूषणाचा झालेला कडेलोट पाहून राहवले नाही. मला यावर काय करता येईल असा विचार करून मी आठ वर्षापूर्वी सायकल चालवायला सुरुवात केली. लोकांपर्यंत वाढत्या प्रदूषणाचा विचार घेऊन जाण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीचा मार्ग निवडला. ‘पर्यावरणाचे संवर्धन करा’ हा विचार घेऊन माझा प्रचार वाया जाऊ नये यासाठी लोकांपर्यंत जात आहे. माझ्या या विचाराकडे अनेक नागरिक सकारात्मक दृष्टीने पाहत असून मला पाठिंबा देत असल्याचे वांजपे यांनी सांगितले.

Leave a Comment