लवकरच सुरुवात होणार ‘चला हवा येऊ द्या’च्या ‘सेलिब्रिटी पर्वा’ला

chala-hawa-yeu-dya
गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवर ‘कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे’, असे म्हणत ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘होऊ दे व्हायरल’ या यशस्वी पर्वानंतर आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस ‘चला हवा येऊ द्या’ चं विशेष ‘सेलिब्रिटी पर्व’ येणार आहे. झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचे लाडके एकूण १६ सिलेब्रिटी या पर्वात सहभागी होणार आहेत.

प्रेक्षकांनी अभिज्ञा भावे, गार्गी फुले-थत्ते, राज हंचनाळे, दीप्ती सोनावणे, महेश जाधव, पल्लवी वैद्य, अद्वैत दादरकर, मिहीर राजदा, शर्मिला राजाराम, उमेश जगताप, मिथिला साळगावकर, मोहिनीराज गटणे, आशुतोष गोखले, राहुल मगदूम, या कलाकारांच्या कॉमेडीची झलक पाहिली आहे. पण काही कलाकारांची नाव अजूनही गुलदस्त्यात आहेत, जी लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतील.

या कलाकारांची ‘सेलिब्रिटी’ पर्वात स्पर्धा होणार आहे. ४ गटांमध्ये हे कलाकार विभागले जाणार आहेत आणि प्रत्येक गटाचा एक कॅप्टन असणार आहे. भाऊ कदम हे ‘डोंबिवलीचे भाऊबली’, कुशल बद्रिके हा ‘कोकणचे हास्यसम्राट’, भारत गणेशपुरे हे ‘विदर्भ फायटर्स’ तर, सागर कारंडे हा ‘साताऱ्याचे शिलेदार’ या टीमचे कॅप्टन्स आहेत. कुठला कलाकार कोणाच्या गटात सहभागी होणार हेदेखील लवकरच प्रेक्षकांना कळेल. या स्पर्धेला त्यानंतर सुरुवात होणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’ चे हे पर्व आणि कलाकारांमधील ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची लाट घेऊन येईल यात शंकाच नाही.

Leave a Comment