तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघात उद्या होणारे मतदान रद्द

election
चेन्नई – निवडणूक आयोगाने उद्या म्हणजेच गुरुवारी १८ एप्रिलला तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघात होणारे मतदान रद्द करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय पैशाचा प्रभाव येथील मतदारांवर टाकण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी घेतला. एखाद्या मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक याप्रकारे रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

२९ मार्चला साडेदहा लाखांची रोकड द्रमुकचे ज्येष्ठ नेते दुराइमुरुगन यांचे पुत्र आणि वेल्लोर येथील पक्षाचे उमेदवार काथिर आनंद यांच्या घरातून हस्तगत झाली होती. तसेच दुराईमुरुगन यांच्या निकटच्या एका व्यक्तीच्या सिमेंट गोदामातून १ एप्रिलला ११ कोटी ५३ लाख रुपये हस्तगत झाले होते. दुराईमुरुगन यांच्या महाविद्यालयातून ही रोकड या गोदामात हलवण्यात आली होती. या मतदारसंघातील निवडणूक या पार्श्वभूमीवर रद्द करावी, अशी शिफारस आयोगाने राष्ट्रपतींकडे केली होती. त्यानुसार राष्ट्रपतींनी वेल्लोरमधील अधिसूचना रद्द केली आहे.

दरम्यान, याबाबत निवडणूक आयोगाला काथिर आनंद यांनी पत्र लिहले आहे. येथील निवडणूक रद्द केल्याने त्याचा फायदा भाजप उमेदवाराला होऊ शकतो. प्राप्तिकर विभागाने टाकलेला छापा हा बनावट अहवालाच्या आधारे टाकण्यात आला आहे. छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे वॉरन्ट नव्हते. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात केलेल्या कारवाईमुळे आमचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment