नमो टीव्ही सुरूच राहणार, पण एका अटीवर ; निवडणूक आयोग

namo-tv
नवी दिल्ली – नमो टीव्हीवर मतदानाच्या ४८ तासांपूर्वी थेट प्रक्षेपण देता येईल पण त्यावर कुठलाही ‘प्रि-रेकॉर्डेड’ कार्यक्रम दाखवता येणार नसल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. नमो टीव्हीवरील प्रक्षेपणामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी केल्यानंतर नमो टीव्हीवर बंदी आणण्यात आली होती. राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांना याप्रकरणी लक्ष घालण्याचेही आदेश दिले गेले आहेत.

भाजपने लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी मोठी तयारी केली आहे. चक्क नमो टीव्ही नावाचे सॅटेलाईट चॅनलही त्यांनी त्यासाठी लॉन्च केले. भाजप या चॅनलवर मोठ्या प्रमाणात प्रचार करत असते. पण आचारसंहितेचे यामुळे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. भारतीय प्रसारण मंत्रालयाला या चॅनलबद्दल त्यानंतर विचारले असता हे चॅनल खरेदी-विक्री करणारे असल्याचे त्यांनी म्हटले होते. कोणत्याही परवानगीची त्यासाठी आवश्यकता नसल्याचे स्पष्टीकरणही दिले होते.

दरम्यान, भाजपच्या प्रचार तंत्रावर विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवल्यानंतर त्यावर कोणतेही रेकॉर्डेड कार्यक्रम चालवण्यावर निवडणूक आयोगाने बंदी आणली होती. निवडणूक आयोगाने या चॅनलवर देखरेख ठेवण्यासाठी २ सदस्यांची समिती नेमली आहे. ते या चॅनलवर निवडणूक काळात २४ तास लक्ष ठेऊन असणार आहेत.

Leave a Comment