तावडे यांना राजनाथ सिंहांच्या गाडीत बसू दे न्हवं – मनसे

vinod-tawade
मुंबई – मनसे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यात देशातील पहिले डिजिटल गाव असणाऱ्या हरिसालमधील सध्याच्या परिस्थितीवरुन चांगलीच जुंपली असून राज ठाकरे यांनी नांदेडमधील सभेतून हरिसालमधील परिस्थिती मांडल्यानंतर यासंदर्भात स्पष्टीकरण देताना तावडे यांनी गावातील सर्व सुविधा योग्य प्रकारे सुरु असल्याचे म्हटले आहे. पण मनसे विरुद्ध तावडे वादातून आता मनसेने थेट राजनाथ सिंह यांनाच एक पत्र पाठवले आहे. आपल्या गाडीत बसण्याची एक संधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना द्या असे पत्र मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पाठवले आहे. यासंदर्भातील माहिती काळे यांनीच ट्विट करुन दिली आहे.


राजनाथ सिंह यांना पाठवलेल्या पत्रात काळे म्हणतात, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्यास आपल्या सुरक्षारक्षकाने रोखल्यापासून, महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना त्वरित मानसोपचाराची गरज आहे. त्यात कहर म्हणजे आपल्या पक्षाने त्यांना राज्याचे गृहखाते सुद्धा न देता निव्वळ शिक्षण खात्यावर बोळवण केल्यामुळे ते दिवसेंदिवस बरसटत चालले आहेत. (गेल्या चार वर्षातील राज्यातील शिक्षण खात्याचे निर्णय पाहून आपल्या लक्षात येईल.) पक्षात कोणी गंभीरपणे घेत नसल्याने मा. राजसाहेबांवर आरोप करुन आपण चर्चेत तरी राहू असा ‘विनोदी’ विचार करुन तावडे सध्या बेताल बडबड करत आहेत. मात्र आता हे सारे त्यांच्या अंगलट येऊ लागले आहे. तरी कृपया आपण महाराष्ट्रात येऊन एकदा या विनोदी तावडेंना आपल्या गाडीत बसू घ्यावे. जेणेकरुन त्यांची गृहमंत्रीपद न मिळाल्याची इच्छा जरी अपूर्ण राहिली असली तरी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गाडीत बसण्याची इच्छा पूर्ण झाल्यामुळे, ते किमान पुन्हा समान्य माणसासारखे वागू लागतील.

Leave a Comment