भाजपमध्ये काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा प्रवेश

kalidas-kolambkar
मुंबई : भाजपचा झेंडा मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी हाती घेतला आहे. कोळंबकरांनी दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

काँग्रेसवर मी नाराज असून मला पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामाचे कौतुक केले म्हणून बाहेर केल्याचे म्हणत कालिदास कोळंबकरांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली. कोळंबकरांनी यावेळी दक्षिण मध्य मुंबईतून युतीचे उमेदवार राहुल शेवाळेच विजयी होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वासही व्यक्त केला.

दक्षिण मध्य मुंबईतून आघाडीचे उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याकडून कोणताही संपर्क झालेला नाही, तर युतीचे उमेदवार असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आपल्या संपर्कात असल्यामुळे मी युतीचा प्रचार ‘बॉस’च्या आदेशानंतर करणार, असा इशारा कालिदास कोळंबकरांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. ज्या पक्षात भविष्यात जाणार आहे, त्या पक्षाचे बॉस, असा उल्लेख करत कोळंबकरांनी मुख्यमंत्र्यांकडे अंगुलीनिर्देश केला होता.

मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे कोळंबकर आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर विधानसभेवर निवडून आले आहेत. कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयांच्या बॅनरवर यापूर्वीच काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दिसले होते. दादरमधील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयासमोरच कालिदास कोळंबकर यांनी बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आपला इरादा जाहीर केला होता.

Leave a Comment