शत्रुघ्न यांच्या होम मिनिस्टर केंद्रातील होम मिनिस्टरला देणार टक्कर

poonam-sinha
लखनौ – समाजवादी पक्षात (सपा) काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी प्रवेश केला आहे. त्यांनी पक्षाची प्राथमिक सदस्यता सपाचे अध्यक्ष अखिलेश यादवांच्या पत्नी डिम्पल यादव यांच्या उपस्थितीत स्वीकारली. लखनौ लोकसभा मतदार संघातून त्या निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी ६ एप्रिल रोजी भाजपला राम-राम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

६ एप्रिल रोजी भाजपला देशभरात ‘शॉटगन’ म्हणून ओळखले जाणारे शत्रुघ्न सिन्हांनी राम-राम ठोकल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयानंतर आता त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा राजकारणात उतरल्या आहेत. पण काँग्रेसमध्ये प्रवेश न करता त्यांनी समाजवादी पक्ष निवडलेला आहे.

पूनम सिन्हांना लखनौ लोकसभा मतदार संघातून समाजवादी पक्ष उमेदवारी जाहीर करू शकते. तर, पाटणा साहिब येथून शत्रुघ्न सिन्हा निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लखनौ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. पूनम सिन्हा या निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे आता येथे काट्याची टक्कर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ६ मे रोजी या लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. राजनाथ सिंहानी मंगळवारीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

समाजवादी पक्ष आणि बसपने उत्तर प्रदेशात आघाडी केल्यामुळे लखनौ येथे भाजपला जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद लावावी लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर, समाजवादी पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेसला लखनौ येथून उमेदवारी न देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांना हरवणे सोपे होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. पूनम सिन्हा १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Leave a Comment