राफेल नावाला वैतागले छत्तीसगडमधील या गावाचे रहिवाशी

rafel
राफेल घोटाळ्याचा मुद्दा सध्याच्या घडीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत चांगलाच चर्चेत आहे. विरोधक सरकारवर राफेल करारावरुन भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत तर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकार विरोधकांना घेरताना दिसत आहे. राफेल हे नाव या सर्व आरोप प्रत्यारोपामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला चांगलेच ठाऊक झाले आहे पण ते नकारात्मक बातम्यांमुळे. छत्तीसगडमधील राफेल गावातील लोकांनी या बदनामीला कंटाळून गावाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे.

राफेल नावाचे गाव छत्तीसगडमधील महासमंद मतदारसंघामध्ये आहे. या गावातील गावकरी १८ एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राफेल प्रकरणानंतर पंचक्रोषीमध्ये २०० कुटुंबाची वस्ती असलेले हे गाव त्याच्या नावामुळे मस्करीचा विषय ठरले आहे. गावाच्या नावामुळे आमची आजूबाजूच्या गावातील लोक थट्टा करतात. सत्तेत आल्यास काँग्रेस राफेलची म्हणजेच आमच्या गावाची चौकशी होणार असल्याचे म्हणत आमची मस्करी करत आहेत. आमची गावाचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातही आम्ही गेले होतो. पण मुख्यमंत्र्यांशी आमची भेट होऊ शकली नसल्याचे गावातील सर्वात वयस्कर नागरिकाने सांगितले.

आमच्या गावाला राफेल प्रकरणामुळे नकारात्मक प्रसिद्धी मिळत आहे. कोणालाही आमच्या गावाची काळजी नसून ते केवळ मस्करीचा विषय झाले आहे. आमच्या गावाबद्दल राज्याबाहेरच्या अनेकांना ठाऊक नसले तरी आमच्याकडे पंचक्रोषीत थट्टेचा विषय म्हणून पाहिले जात असल्याची खंत या नागरिकाने बोलून दाखवली. या गावाकडे आजूबाजूच्या गावांचे राफेल प्रकरणामुळे लक्ष वेधले गेले असले तरी साध्या नागरी सुविधांचाही गावामध्ये अभाव असल्याचे दिसून येते. गावामध्ये प्यायचे पाणी, स्वच्छता यासारख्या सुविधाही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. आजही पाण्यासाठी राफेलमधील नागरिक पावसावरच अवलंबून आहेत. पाऊस पडला तर ठीक नाहीतर त्यांना वर्षभर पाणीटंचाईचा समाना करावा लागतो.

ज्या महासमंद मतदारसंघामध्ये राफेल गाव आहे त्या मतदारसंघातून सध्याचे भाजपचे विद्यमान खासदार चंदूलाल शाहू हेच पुन्हा खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसने त्यांच्याविरोधात धनेंद्र शाहू यांना तर बहुजन समाज पक्षाने धनसिंग कोसरिया यांना निवडणुकीचे तिकीट दिले आहे.

Leave a Comment