मोदी यांचा फोटो असलेले तिकीट प्रवाशांना दिल्याप्रकरणी दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचे निलंबन

ticket
बारांबाकी – दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले तिकीट प्रवाशांना दिल्याप्रकरणी निलंबन करण्यात आले आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशातील बारांबाकी रेल्वे स्थानकावर घडला. निवडणूक आचारसंहिता सध्या लागू असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बारांबाकी रेल्वे स्थानकामधील दोन कर्मचाऱ्यांनी १३ एप्रिल रोजी प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले तिकीट दिले होते. पण सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता देशभरात लागू असल्याने सरकारी व्यासपीठावरून अशा प्रकारे जाहीरातबाजी करणे आचारसंहितेचे उल्लंघन ठरते.

दरम्यान, मोदींचा फोटो नसलेल्या कागदाच्या रोलवर छापलेली तिकीटे या रेल्वे स्थानकात सुरुवातीला प्रवाशांना दिली गेली होती. पण, या कर्मचाऱ्यांची शिफ्ट संपल्यानंतर त्याजागी दुसरे कर्मचारी आले आणि त्याचवेळी तिकीटाच्या कागदाचा रोल संपल्याने या कर्मचाऱ्यांनी चुकून मोदींचा फोटो असलेला रोल मशीनला लावला आणि त्यावर तिकीटे छापली आणि ती अनावधानाने प्रवाशांना देण्यात आली, असे या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment