नेपाळमध्ये पबजी गेम खेळताना सापडल्यास होणार अटक

pubg
काठमांडू : न्यायालयाच्या आदेशानंतर नेपाळमध्ये जगभरात लोकप्रिय असलेला इंटरनेट गेम ‘पबजी’वर बंदी घालण्यात आली आहे. तरुण आणि लहान मुलांच्या वागणुकीवर या गेममुळे नकारात्मक परिणाम होत असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. नेपाळी माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. दरम्यान, एखादी व्यक्ती हा गेम खेळताना सापडल्यास त्याला अटक केली जाणार आहे. ‘पबजी’वर नेपाळमध्ये बंदी घातल्यानंतर भारतातही या गेमवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

नेपाळी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सर्व इंटरनेट आणि मोबाईल सेवा प्रदात्यांना ‘पबजी’ या गेमवर बंदी घालण्याचे आदेश नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाने (दी नेपाल टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी) दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पबजीवर बंदी घातल्यानंतर कोणतीही व्यक्ती हा गेम खेळताना सापडल्यास त्याला अटक केली जाईल.

काठमांडू जिल्हा न्यायालयात महानगरीय गुन्हे शाखेद्वारे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, लहान मुलांच्या वागणुकीवर हा गेम खेळल्याने नकारात्मक परिणाम होतात. न्यायालयाने या मुद्द्याकडे लक्ष वेधत पबजीवर बंदी घालण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर गुन्हे शाखेने नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाला (एटीए) पत्र लिहून गेमवर बंदी घालण्याची विनंती केली.

Leave a Comment