धनाढ्य मंडळीचे वेगळे थाट मागवितात लंडनमधून विमानाने पिझ्झा !

pizza
आजच्या ‘फास्ट’ युगामध्ये आपल्या धावत्या जीवनशैली सोबतच आपले ‘फूड’ ही ‘फास्ट’ झालेले आहे. झटपट, ताजे, चविष्ट आणि घरपोच मिळणारे हे अन्नपदार्थ आजच्या पिढीच्या आयुष्याची जीवनरेखा असून, या अन्नपदार्थांच्या विना आपल्या आयुष्याची कल्पनाच आपण करू शकत नाही, अशी परिस्थिती सध्या आहे. याच ‘फास्ट फूड’ची खासियत असलेला पिझ्झा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रिय आहे. नाईजिरिया देशामध्ये देखील हा खाद्य पदार्थ अतिशय लोकप्रिय असून या देशातील मोठ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी पिझ्झेरिया आहेत. तरीदेखील या देशातील काही धनाढ्य लोकांचे थाट आणि पिझ्झाचे वेड असे, की यांच्यासाठी पिझ्झा खास विमानसेवेद्वारे चक्क लंडनहून मागविला जात असतो.

नाईजिरियाचे कृषी मंत्री ओदू ओग्बेह यांनी या संदर्भात वक्तव्य केले असून, नाईजिरीयातील अनेक धनाढ्य मंडळी आपल्या ऐपतीचे प्रदर्शन करण्याकरिता तब्बल ६४४० किलोमीटर अंतरावर असलेल्या लंडन शहरामधून विमानाने पिझ्झा मागवीत असल्याचे ओग्बेह यांनी म्हटले आहे. ही मंडळी रात्री पिझ्झाची ऑर्डर देत असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रिटीश एअरवेजच्या विमानाने या पिझ्झाची डिलिव्हरी नाईजिरियामध्ये केली जात असल्याचेही ओग्बेह यांनी सांगितले. कृषी मंत्र्यांनी हे तथ्य नाईजिरियाची राजधानी अबुजा येथे झालेल्या सेनेटर कृषी समितीच्या बैठकीमध्ये सादर केले होते. धनाढ्य व्यक्तींनी अशा प्रकारे आपल्या ऐपतीचे प्रदर्शन करणे अयोग्य असल्याचे मतही कृषी मंत्र्यांनी बैठकीमध्ये बोलताना व्यक्त केले असल्याचे समजते. या बाबतीत ओग्बेह यांचा एक व्हीडोयो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

Leave a Comment