17 एप्रिलला राज ठाकरे यांची उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभा

raj-thakre
सातारा – 17 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाआघाडीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे. राज ठाकरे सातारच्या सभेत काय बोलणार याबाबतही लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर उदयनराजे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते स्टार आहेत. सोशल मीडियावर उदयनराजे व राज ठाकरे यांच्या संबंधीची कोणतीही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ती गुगल ट्रेडिंगमध्ये येते. एका क्षणात त्यांची बातमी लाखो वाचक वाचतात. त्यामुळे उदयनराजे व राज ठाकरे यांचे लोकप्रियता लक्षात येऊ शकते. सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजे रिंगणात आहेत. राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या नेहमीच्या शैलीत महायुतीवर व पर्यायाने नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागायला सुरुवात केली आहे.

साताऱ्यातील गांधी मैदानावर 17 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राज यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच उदयनराजे व राज ठाकरे एका व्यासपीठावर येत असल्यामुळे, या सभेकडे सातारा तसेच महाराष्ट्रातील लोकांचे लक्ष लागलेले आहे. उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. वाई, पाटण, जावळी सारख्या दुर्गम भागात प्रचारासाठी फिरत आहेत, असे असताना राज ठाकरे यांची साताऱ्यात सभा निश्चितच वादळी ठरणार आहे. महायुतीवर राज ठाकरे आपल्या नेहमीच्या शैलीत तोप डागणार आणि “एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी”, असे म्हणत उदयनराजे कॉलर उडवणार, त्यामुळे 17 तारखेला साताऱ्यात होणाऱ्या सभेला तोबा गर्दी होणार एवढे मात्र निश्चित आहे.

Leave a Comment