सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक पीएम नरेंद्र मोदीच्या प्रदर्शनावर स्थगिती लावली असतानाच राज्य निवडणूक आयोगाने धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांच्या ‘धुमस’ या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
धनगर समाजाच्या नेत्यांच्या चित्रपटावर निवडणूक आयोगाची बंदी
‘धुमस’ हा चित्रपट ५ एप्रिलला नियोजित तारखेला प्रदर्शित झाला. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर हे दोघे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात आपणच काम केले तर चित्रपट नक्की चालेल अशी खात्री वाटल्याने त्यांनी स्वतःच या चित्रपटाची निर्मिती केली होती. पण गोपीचंद आधी निवडणुकीच्या मैदानापासून दूर होते. मात्र आठवड्याभरापूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून पडळकर यांना सांगलीतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने सगळी समीकरणे बदलल्यामुळे लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचा चित्रपट थिएटर्समध्ये कसा चालू द्यायचा असा प्रश्न निर्माण झाला.
निवडणुक आयोगाच्या निदर्शनास पडळकर आणि जानकर यांच्या विरोधकांनी ही बाब आणून देताच आज त्यांनी त्यांना याबाबत रितसर नोटीस बजावली. हा चित्रपट यानुसार त्वरीत थिएटर्समधून मागे घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यासोबतच या चित्रपटाच्या पब्लिसिटी आणि प्रमोशनसाठी वापरण्यात आलेले साहित्य मागे घेण्याचे आदेशही देण्यात आले. याशिवाय या चित्रपटाचे टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांवर सुरू असलेले प्रोमोही मागे घ्यावेत असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.