मुंबई – आता राज्य निवडणूक आयोगाने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून भाजप सरकारच्या विविध सरकारी योजनांचा प्रचार केल्याच्या तक्रारीची दखल घेतली असून अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी असा प्रचार करणाऱ्या झी टीव्ही आणि अँड टीव्हीवरील मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती दिली.
भाजपचा प्रचार करणाऱ्या मालिकांना निवडणूक आयोगाची नोटीस
केंद्रातील मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार झी आणि अँड टीव्हीवरील मालिकांमधून करून आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मुख्य निवडणूक कार्यालयाने या तक्रारींची दखल घेतली आहे. या नोटीसद्वारे असा प्रचार करणाऱ्या या दोन्ही वाहिन्यांवरील संबंधित मालिकांच्या निर्मात्यांना २४ तासात त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही आयोगाकडून करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.
भाजपच्या सरकारी योजनांचे गुणगान अँड टीव्हीवरील भाभीजी घर पर हैं तर झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकांमधून करण्यात आले होते. अनेकांनी मालिकेच्या याच भागांवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. यासोबतच झी आणि अँड टीव्हीचे प्रक्षेपण थांबवा आणि भाजपचा प्रचार करणाऱ्या मालिकांवर कारवाई करा, अशी मागणीही काँग्रेसने केली होती.