भाजपवासी होणार राधाकृष्ण विखे पाटील !

radha-krishna-vikhe
नगर – लवकरच भाजपमध्ये पुत्र सुजय विखे पाटील यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटीलही प्रवेश करणार असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे. राधाकृष्ण विखे पाटील नगरमध्ये होणाऱ्या जाहीरसभेत भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. काही आमदारही राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती आहे.

राज्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी राधाकृष्ण विखे पाटील एक आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात निश्चित भाजपला बळ मिळेल तर काँग्रेसला याचा फटका बसेल. त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगर लोकसभेच्या जागेचा तिढा न सुटल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांना लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे अहमदनगरची जागा होती. ही जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्यामुळे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये सुजय विखे पाटील गेल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटीलही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली होती.

२३ मे नंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची भूमिका आहे. पण पक्षातून २३ मे नंतर हकालपट्टी होण्याची शक्यता असल्यामुळे ते आधीच प्रवेश करु शकतात. काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर, अब्दुल सत्तार हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करतील. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात शैक्षणिक आणि वाहतूक मंत्री होते तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषि मंत्री होते.

Leave a Comment