मुंबई : भारतातील युजर्ससाठी सर्वात स्वस्त प्लान नेटफ्लिक्स या जगप्रसिद्ध ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मद्वारे लाँच करण्यात आला आहे. मोबाईल युजर्ससाठी हा प्लान असून फक्त 250 रुपये किंमतीच्या या प्लानमध्ये महिनाभर नेटफ्लिक्स वापरता येणार आहे.
ऑनलाईन स्ट्रिमिंग अॅप्सची लोकप्रियता भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या भारतीय युजर्सकडे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम यासारखे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी नेटफ्लिक्सची भारतातील लोकप्रियता जरी जास्त असली तरी त्याची किंमत बऱ्याच युजर्सच्या खिशाला परवडणारी नसल्यामुळे आता कंपनीकडून नवीन 250 रुपये किंमतीचा प्लान आणण्यात आला आहे. ज्यामुळे महागडा वाटणारा हा प्लॅटफॉर्म आता अनेकांच्या खिशाला परवडणारा झाला आहे.
केवळ मोबाईल आणि टॅब्लेट युजर्ससाठी नेटफ्लिक्सचा हा नवीन प्लान आहे. एचडी किंवा अल्ट्रा एचडी कंटेंट 250 रुपयांच्या या प्लानमध्ये मिळणार नाही. तसेच एकावेळी एकाच डिव्हाईसवर नेटफ्लिक्स वापरता येणार आहे. नेटफ्लिक्सचा हा जगभरातील सध्याचा सर्वात स्वस्त प्लान आहे. आतापर्यंत नेटफ्लिक्सचे 500, 650 आणि 800 रुपये असे तीन वेगवेगळे प्लान होते. यासोबतच नेटफ्लिक्सकडून ‘विकली प्लान’ आणण्याबाबत देखील विचार सुरु आहे. या विकली प्लानची किंमत जवळपास आठवड्याला 1$ (65 रुपये) असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.