नसीरुद्दीन शाह, कोंकणा, पालेकरांसह 600 कलाकार म्हणतात, भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करु नका

trio
मुंबई : भाजप सरकारविरोधात देशभरातील जवळपास 600 नाट्य कलाकार एकवटले असून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान न करण्याचे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि अभिनेत्री रत्ना पाठक-शाह या दाम्पत्यासह दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा यासारख्या कलाकारांनी केले आहे.

या सहाशे कलाकारांनी पत्रक काढून मतदारांना कट्टरता, द्वेष, आणि उदासीनतेला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन केले आहे. नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक-शाह, अमोल पालेकर, अनुराग कश्यप, कोंकणा सेन शर्मा, डॉली ठाकोर, लिलिएट दुबे, अभिषेक मजुमदार, संजना कपूर यासारख्या 616 कलाकारांच्या या पत्रकाखाली स्वाक्षऱ्या आहेत.

धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि सर्वसमावेशक भारतासाठी मतदान करा, भाजप आणि त्याच्या सहयोगींविरोधात मत द्या. कमजोरांना सशक्त करण्यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी आणि वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी मतदान करा, असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. विविध बारा भाषांमध्ये हे पत्रक प्रसारित करण्यात आले आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात या सर्वात महत्त्वाच्या निवडणुका आहेत. विकासाची आश्वासने देत भाजप सत्तेत आली. मात्र द्वेष आणि हिंसाचाराच्या राजकारणात त्यांनी हिंदुत्व गुंडांना मुक्तसंचार करु दिला, असेही या पत्रकात म्हटले आहे. पाच वर्षांपूर्वी ज्याची राष्ट्राचा रक्षणकर्ता अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली होती, त्याने आपल्या धोरणांद्वारे लाखो नागरिकांची उपजीविका नष्ट केली, असाही दावा या पत्रकात करण्यात आला आहे.

Leave a Comment