फणस चोरी प्रकरणी वकीलाला तुरुंगवास

jackfruit
लखनऊ: उत्तर प्रदेशातील एक वकीलाला न्यायालयाच्या परिसरात असलेल्या झाडावरुन फणस तोडणे खुपच महागात पडले आहे. त्या वकीलाला चोरीचा आरोप सिद्ध झाल्यामुळे अटक करण्यात आली असून थेट तुरुंगात या वकिलाची रवानगी करण्यात आली आहे. हा अजब प्रकार बस्ती जिल्ह्यात घडला.

एक फणसाचे झाड बस्तीच्या दिवाणी न्यायालयाच्या परिसरात असून न्यायालय परिसरात सकाळच्या सुमारास आलेल्या वकील नीरज चौधरी यांनी एक फणस तोडण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यावेळी उपस्थित असलेल्या शिपायाने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. चौधरी यांना याचा राग आला. संतापाच्या भरात शिपायाला त्यांनी मारहाण केल्यानंतर या प्रकाराची माहिती शिपायाने 100 नंबरवर फोन करुन पोलिसांना दिली.

नीरज चौधरी यांची घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी झडती घेतली असता. त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीत त्यावेळी पोलिसांना एक फणस सापडला. पोलिसांनी त्यानंतर त्यांना अटक केली. चोरीचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला. न्यायालयात नीरज यांना हजर करण्यात आले. न्यायमूर्तींनी त्यांना यावेळी न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या नीरज बस्ती तुरुंगात असून बस्तीच्या दिवाणी न्यायालय परिसरातील फणस सर्रास चोरीला जात असल्याने असे प्रकार रोखण्यासाठी शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे.

Leave a Comment