एवढ्या संपत्तीच्या मालकीन आहेत ‘ताई’

supriya-sule
मुंबई : शरद पवार यांच्या कन्या व बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या कोट्याधीश असल्याचे समोर आले आहे. सुप्रिया सुळेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. एकूण 58.78 कोटी रुपये एवढी सुप्रिया सुळे यांची संपत्ती आहे. तर सुमारे 161.27 कोटी रुपयांची संपूर्ण सुळे कुटुंबाची मालमत्ता आहे.

सुप्रिया सुळेंच्या संपत्तीमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत एकूण 12 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सुमारे 46.09 कोटी रुपये एवढी 2014 मध्ये त्यांची एकूण संपत्ती होती.

21.26 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. तर स्थावर मालमत्ता 18.40 कोटी रुपयांची आहे. 2.70 कोटी रुपये किंमतीची शेतजमीन त्यांच्याकडे आहे. तर 1.03 कोटी रुपये किंमतीची बिगर शेतजमीन आहे.

28 हजार 770 रुपयांची रोकड सुप्रिया सुळेंकडे आहे. त्यांचे पती सदानंद सुळे यांच्याकडे 23 हजार 050 रुपये, मुलगी 28 हजार 900 रुपये आणि मुलगा 13 हजार 600 रुपयांची रोख रक्कम आहे. पण सुप्रिया सुळेंवर पार्थ पवार यांचे 20 आणि सुनेत्रा पवार यांचे 35 असे एकूण 55 लाख रुपयांचे कर्ज आहे. एकही गुन्हेगारी खटला सुप्रिया सुळे यांच्याविरोधात नाही.

बारामतीच्या सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार आहेत. सलग दोन टर्म त्या बारामतीच्या खासदार आहेत. बारामती मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात 2006 पासून झाली होती. त्यावेळी त्या पहिल्यांदा राज्यसभेच्या खासदार बनून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचल्या होत्या. तर 2009 मध्ये त्या पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढल्या आणि लोकसभेच्या खासदार बनल्या.

Leave a Comment