बिहारमधील यादवी नीतीशकुमारांच्या पथ्यावर

nitish-kumar
लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत बिहारमध्ये रंगलेल्या एका फॅमिली ड्रामाकडे जास्त लोकांचे लक्ष गेलेले दिसत नाही. हे नाट्य बिहारच्या राजकारणात गेल्या तीन दशकांपासून दबदबा राखून असलेल्या लालुप्रसाद यादव यांच्या घरात रंगले आहे. वास्तविक कुटुंब नियोजनाचा काळ असूनही लालूप्रसाद यांनी त्या वेळेस कुटुंब नियोजनाकडे लक्ष दिले नाही. सात मुली आणि दोन मुले मिळून त्यांना नऊ मुले आहेत. बिहारसहित उत्तर भारतातील बहुतेक राज्यांमध्ये आजही पुरूषप्रधान मानसिकता पाहायला मिळते. पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष राजकारणाचे खंदे समर्थक मानले जाणारे लालूप्रसादही त्या मानसिकतेला अपवाद नाहीत. त्यांच्या सात मुलींपैकी केवळ एक, थोरली मुलगी, मिसा भारती राजकारणात आहेत आणि खासदार आहेत. त्यांच्या अन्य मुलींचे लग्न झाले असून त्या आपापल्या संसारात सुखी आहेत. त्यामुळे तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव या त्यांच्या दोन मुलांवर त्यांचा राजकीय वारसा सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. आज लालूप्रसादांच्या घरात जी यादवी माजली आहे, ती या दोन भावांमध्येच.

तेजप्रताप आणि तेजस्वी या दोघांच्या अहंकारात सध्या संघर्ष उद्भवला आहे. हा संघर्ष दीर्घकाळापासून सुरू आहे. आता या संघर्षाचा भडका उडाला असून दोन्ही भावांनी एकमेकांविरोधात तलवारी उपसल्या आहेत. तेजप्रताप हे थोरले तर तेजस्वी हे धाकटे. शिवाय तेजप्रताप हे अधिक शिकलेले आहेत, तर तेजस्वी यांचे शिक्षण केवळ नववीपर्यंत झालेले. तेजस्वी यांना क्रिकेटपटू व्हायचे होते म्हणून त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. मात्र तेजस्वी हे अधिक हुशार आहेत, असे म्हणतात. त्यामुळे लालूंनी त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे तेजप्रतापांचा अहं दुखावला. दोन वर्षांपूर्वी 27 ऑगस्ट रोजी पाटण्यातील गांधी मैदान येथे झालेल्या सभेत तेजस्वी यांनी आपण कृष्ण असून मोठे भाऊ तेजप्रताप यांचे सारथी बनण्याची घोषणा केली होती. मात्र नंतर तेजस्वी यांनी संघटनात्मक निर्णय घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे तेजप्रताप हे त्यांच्यावर नाराज आहेत, असे सांगण्यात येते
लोकसभा निवडणुकीत तेजस्वी यांनी तिकिट वाटपाची सूत्रे आपल्या हाती ठेवली. त्यामुळे तेजप्रताप संतप्त होणे स्वाभाविक होते. काही दिवसांआधी त्यांनी राष्ट्रीय जनता दलापासून वेगळे होण्याची भाषा केली होती. त्यावेळी लालूप्रसादांनी व राबडीदेवी यांनी त्यांची समजूत घातली. त्यामुळे तेजप्रताप यांनी काही काळ माघार घेतली मात्र आता पुन्हा त्यांनी डोके वर काढले आहे. राजदपासून वेगळे होऊन त्यांनी लालू-राबडी मोर्चा नावाची आघाडी उघडली आहे. इतकेच नव्हे तर बिहारमधील सर्व 40 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. मात्र यावेळी लालूंनी त्यांना धमकी देऊन गप्प केले.

लालूंच्या धमकावणीमुळे आपले उमेदवार उभे न करण्याचे तेजप्रताप यांनी मान्य केले, तरी त्यांनी एक नवीनच खेंगटे काढले आहे. मला एका अज्ञात क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी राजरोस पोलिस तक्रार दिली आहे.
लालूप्रसाद हे सध्या राजेंद्र इन्स्टिट्यूट्स ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) येथे उपचार घेत आहेत. त्यांना चारा गैरव्यवहारप्रकरणी शिक्षा झाली आहे. आपल्याच दोन मुलांमध्ये बेबनाव झाल्यामुळे ते त्रस्त आहेत.

तेजप्रताप हे आधी राजदच्या विद्यार्थी आघाडीचे संरक्षक होते. बिहारमधील राजकीय पंडितांच्या मते, तेजस्वी हे आक्रमक असल्यामुळे लालूप्रसाद यांनी राजकीय वारस म्हणून त्यांची निवड केली. त्या तुलनेत तेजप्रताप हे एकदम मवाळ आहेत. पाटण्यात त्यांचे स्वतःचे मोटरबाईकचे शोरूम आहे. कृष्णाचे अनन्य भक्त अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांना महागड्या कारची हौस आहे, मात्र सर्वसामान्य जीवन जगण्यात त्यांना रस आहे. त्यांना राजकारणात रस नव्हता, मात्र लालूप्रसाद आणि राबडीदेवींच्या आग्रहावरून ते राजकारणात आले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीपर्यंत ते राजदच्या बैठकीतही भाग घेत नसत.

बिहारमध्ये सध्या संयुक्त जनता दलाचे सरकार असून नीतीशकुमार मुख्यमंत्री आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक राजदसोबत लढली होती. नीतीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात तेजप्रताप हे आरोग्यमंत्री होते, तर तेजस्वी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले होते. मात्र लालू आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हस्तक्षेपाला वैतागून त्यांनी भाजपशी घरोबा केला. या पार्श्वभूमीवर लालूप्रसादांच्या कुटुंबातील हा कलह चव्हाट्यावर येणे त्यांच्या पथ्यावर पडणारे आहे.

Leave a Comment