लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार कुमार विश्वास !

kumar-vishwas
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे बंडखोर नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास भाजपचा प्रचार करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा याबाबत विचारविनिमय सुरु असून पूर्व दिल्लीतून कुमार विश्वास निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात.

सोमवारी (1 एप्रिल) रात्री कुमार विश्वास यांची भाजप दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी भेट घेतली होती, या चर्चांना तेव्हापासून उधाण आले आहे. पूर्व दिल्ली मतदारसंघातून कुमार विश्वास आपच्या उमेदवार आतिशी यांच्याविरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे एक तास मनोज तिवारी आणि कुमार विश्वास यांच्यात बातचीत झाली. त्यानंतर कुमार विश्वास यांच्या नावाची पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघासाठी शिफारस केली. पण पक्षश्रेष्ठीच याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत. दिल्लीच्या लोकसभा जागेसाठी दिल्ली भाजप प्रदेश युनिटने आधीच अनेक नावांची शिफारस केली आहे. दिल्लीच्या सात मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा भाजप 5 एप्रिल रोजी करणार असल्याचा अंदाज आहे.

भाजपचे महेश गिरी दिल्ली पू्र्व मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत. गुजरातच्या जुनागडचे तिकीट त्यांना दिले जाऊ शकते. येथे ते एका पिठाचे प्रमुख होते. याआधी अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये मनोज तिवारी आणि कुमार विश्वास एकमेकांना भेटले आहेत. यावेळी त्यांच्यातील मैत्रीचे संबंध समोर आले होते.

Leave a Comment