एकाच संघात खेळणार मिताली राज-विराट कोहली

virat-kohli
मुंबई : मागील काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. नुकताच विराटसेनेने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांना त्यांच्याच भूमीत नमवण्याचा पराक्रम करून दाखवला, भारतीय महिलांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पुरुष संघाप्रमाणेच मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महिला संघानेही आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. भारतीय क्रिकेटमधील हे दोन आघाडीचे कर्णधार लवकरच आपल्याला एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत. प्रथमच महिला व पुरुष खेळाडूंचा #ChallengeAccepted या मोहीमे अंतर्गत समावेश असलेल्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमुर्ती या महिला क्रिकेटपटूंसह विराट कोहली त्यात एक संदेश देत आहेत. आगामी काळात महिला व पुरुष एकाच संघातून एकत्र खेळताना दिसतील असे त्यात सांगण्यात आले आहे.

विराट कोहली म्हणाला, क्रिकेट हा असा खेळ आहे की येथे स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव होत नसल्यामुळे सर्वांना समान वागणुक मिळणे आवश्यक आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी हे महत्त्वाचे आहे. यावर मिताली राज म्हणाली, महिला क्रिकेटमध्ये मागील काही वर्षांत बरीच सुधारणा झालेली आहे. पण, असमानता मैदानावर अजूनही दिसत आहे. महिला क्रिकेटला खेळपट्टीचा आकार, संधी, पगार, प्रक्षेपण आणि चाहत्यांचा पाठींबा यात अजूनही दुय्यम स्थान मिळत असल्यामुळे या मोहीमेला मी पाठींबा देत आहे.

Leave a Comment