नांगरे पाटलांनी शोधली आईला भिख मागायला लावणारी मुले

vishwas-nangare
नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. एक महिला ज्यामध्ये सांगत होती की, माझा एक मुलगा पीएसआय तर दुसरा मुलगा कंडक्टर आहे. या वृद्ध महिलेचे प्रमिला पवार अशा नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही महिला बाहेरच होती. त्यांचा सांभाळ मुले करत नाही असे त्यांचे म्हणणे होते. पण याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अखेर पुढाकार घेतला आणि या मातेला न्याय मिळवून दिला.

पोलिसांच्या प्रयत्नामुळे तीन वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेलेल्या 61 वर्षीय या महिलेला निवारा मिळाला. त्यांच्या मुलांना शोधण्याचे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिल्यानंतर पुढे आले की वस्तू व सेवा कर विभागात त्यांचा मुलगा सतीश हे अधीक्षक आहेत. तर दुसरा मुलगा कंडक्टर आहे. या मातेने दोन्ही मुलांना पतीच्या निधनानंतर मोठे केले. दोघांची लग्न करुन दिली. पण त्यानंतर मात्र घरात वातावरण बदलले. दोघेही नोकरीनिमित्त दुसऱ्या गावाला गेले. पण ही आई मात्र एकटी पडली.

प्रमिला नाना पवार यांची कथा जगासमोर आल्याने अनेकांमध्ये संतापाची लाट होती. प्रमिला पवार यांनी म्हटले की, दोन्ही मुले सांभाळ करत नाहीत. त्यांना त्रास देतात म्हणून त्या घर सोडून निघून गेल्या. प्रमिला पवार, त्यांचा मुलगा सतीश आणि सून सीमा यांना विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस आयुक्तालयात समक्ष बोलावले आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर मुलाने आणि सुनेने आईला घेऊन यापुढे एकत्र राहू असे सांगितल्यानंतर भावपूर्ण वातावरणात त्यांनी पोलीस आयुक्तालयातून निरोप घेतला.

Leave a Comment