
वॉशिंग्टन : सोशल मीडियावर ‘फेक न्यूज’चे पेटलेले पेव पाहिल्यानंतर त्यावर लगाम लावण्यासाठी फेसबुकने काही उपाययोजनाही केल्या. पण आता स्वत:च्याच एका ‘न्यूज टॅब’वर काम फेसबुकने सुरू केले आहे. मंगळवारी ही माहिती फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे. फेसबुकच्या या न्यूज टॅबचा उच्च गुणवत्ता आणि विश्वसनीय पत्रकारितेला आर्थिक रुपात समर्थन देण्यासाठी वापर केला जाऊ शकतो, असे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.
फेसबुकवर लवकरच दिसणार ‘न्यूज टॅब’
माथियास डॉफनर आणि जर्मनीचे मीडिया दिग्गज एक्सल स्प्रिंगर यांच्यासोबत झुकरबर्ग यांनी तंत्रज्ञान आणि समाजाचे भविष्य’ या विषयावर एका व्हिडिओ चर्चेदरम्यान ही माहिती दिली आहे. विश्वसनीय बातम्यांची अपेक्षा असणाऱ्या युझर्सच्या मदतीसाठी हे एक वेगळे डिजिटल उत्पादन असेल, असेही झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. उच्च गुणवत्ता आणि विश्वसनीय माहिती समोर आणण्यासाठी याचा वापर होईल, अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
‘न्यूज टॅब’मध्ये एकूण फेसबुक युझर्सपैंकी १० ते १५ टक्के युझर्स रुची असणारे आहेत. आम्ही यामध्ये पत्रकारांनी रचलेल्या बातम्या दाखवणार नाहीत. तसेच फेसबुक याद्वारे शक्यतो थेट प्रकाशकांसोबत संबंध प्रस्थापित करू शकतो, असेही झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.
