येथे आहेत चक्क रोबोट आचारी’; पहा व्हिडीओ


अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये आता अनेक ठिकाणी ‘रोबोटिक रेस्टॉरंट’ दिसू लागली आहेत. म्हणजेच रेस्टॉरंटमध्ये पदार्थ बनविण्यासाठी ‘रोबोटिक्स’ ह्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊन पदार्थ तयार करण्याची संपूर्ण प्रकिया यंत्रांच्या मार्फत पार पडली जात आहे. रेस्टॉरंटमध्ये पदार्थ बनविला जाण्यापासून ते सर्व्ह केला जाण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी ह्या अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या वापर होताना दिसू लागला आहे. रेस्टॉरंटमध्ये बनविले जाणारे पदार्थ यंत्रांच्या द्वारे बनविले जात असल्यामुळे हे पदार्थ अधिक स्वच्छतेने, आणि कमी किंमतीमध्ये उपलब्ध होऊ लागले आहेत. ह्या तंत्रज्ञानाचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे ‘क्रियेटर’ हे रोबोटिक रेस्टॉरंट. अत्याधुनिक यंत्रप्रणाली वापरून ह्या रेस्टॉरंटमध्ये सर्व प्रकारचे हॅम्बरगर तयार केले जातात. ह्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत लोकांची मते विचारली गेली असता, अनेकांना ही कल्पना अतिशय रोचक वाटली, तर काहींनी, जर रोबोट सर्व कामे करू लागले, तर त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये पदार्थ तयार करण्याच्या कामी असलेल्या लोकांना त्यांच्या रोजगाराला मुकावे तर लागणार नाही, अशी शंका उपस्थित केली. सॅन फ्रान्सिस्को हे शहर जगातील अतिशय महाग शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते, त्यामुळे येथे राहणे परवडण्यासाठी सर्वसामान्य माणसाला काम करण्यावाचून गत्यंतर नाही. पण अजून अश्या तऱ्हेची यंत्रप्रणाली सगळीकडे सर्रास वापरली जात नसल्याने लोकांचे रोजगार जाण्याची भीती अजून तरी उद्भविलेली नाही.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी, की रेस्टॉरंट जरी रोबोटिक असले आणि पदार्थ यंत्राद्वारे तयार केला जात असला, तरी हा पदार्थ बनविण्यासाठी जी पूर्वतयारी करावी लागते, ती करण्यासाठी मात्र कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतेच. म्हणजे, पिझ्झा वरील सॉस जरी यंत्राच्या मार्फेत पिझ्झा बेसवर पसरविला जात असला, तरी मुळात ह्या यंत्रामध्ये सॉस तयार करून तो भरून ठेवण्याची जबाबदारी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनाच पार पाडावी लागते. तसेच ‘क्रियेटर’ मधील हॅमबर्गर साठी मशीनच्या ट्युब्स मध्ये बर्गरचे बन्स भरून ठेवणे, किंवा बर्गरवर भाज्या घालण्यासाठी यंत्रांमध्ये भाज्या भरून ठेवणे ही सर्व कामे कर्मचाऱ्यांच्या द्वारेच केली जात असतात.

‘व्हर्ज’ द्वारे क्रियेटर मधील रोबोटिक सिस्टममार्फत बर्गर बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया दर्शविणारा एक व्हिडियो यु ट्यूबबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. चौदा फुट लांबीच्या ह्या ‘ऑल इन वन ‘ यंत्रामध्ये ३५० निरनिराळे सेन्सर्स असून, एकूण वीस संगणकांच्या मदतीने हे यंत्र ऑपरेट केले जाते. ह्या यंत्रामध्ये ग्राहकांना हवे असलेले हर तऱ्हेचे बर्गर केवळ पाच मिनिटांमध्ये तयार होतात. अश्या प्रकारची दोन यंत्रे असलेल्या ह्या रेस्टॉरंटमध्ये एका तासाच्या अवधीत १३० बर्गर केले जाऊ शकतात. बर्गर बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्व साधन सामग्रीची तयारी करण्यासाठी येथे वेगळे किचन असले, तरी प्रत्यक्ष बर्गर मात्र यंत्राच्या द्वारेच तयार केले जातात. त्याचबरोबर प्रत्येक बर्गर अगदी ताजा असून, अतिशय चविष्ट तर आहेच, शिवाय इतर ठिकाणी मिळणाऱ्या बर्गर्सच्या मानाने स्वस्तही असल्याने ग्राहक समाधानी आहेत. तसेच हे बर्गर तयार होताना संपूर्णपणे यंत्रांच्या मार्फत तयार होत असल्याने जंतूंचा संसर्ग होण्याचा धोकाही कमी झाल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment