महाभारतकालीन ही मंदिरे आजही आहेत अस्तित्वात.

mahabharat
ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद या चार वेदांच्या खेरीज महाहारात हा पाचवा वेद मानला गेला आहे. महाभारताच्या कथेमध्ये उल्लेख केलेल्या अनेक स्थळांचे अस्तित्व आजही सापडते. या स्थळांमध्ये प्रामुख्याने उल्लेख सापडतो तो म्हणजे हस्तिनापुराचा. कुरु वंशाची ही राजधानी. वर्तमान काळामध्ये हे ठीकाण उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ शहराच्या जवळ आहे. मेरठ शहर भारताची राजधानी दिल्लीपासून सुमारे नव्वद किलोमीटरच्या अंतरावर उत्तरपूर्वेला, गंगेच्या किनारी आहे. कालिदासाने लिहिलेल्या अभिज्ञान शाकुंतलम या काव्यामध्ये दुष्यंत याच प्रांताचा शासक असल्याचे वर्णन आहे. महाभारतकालीन गांधार प्रांताची राजधानी तक्षशिला होती. तक्षशिला आणि पुरुषपुर ही गांधार प्रांतातील दोन महत्वाची शहरे होती. आताच्या काळामध्ये ही शहरे ‘तक्सिला’ आणि पेशावर या नावाने ओळखली जात असून वर्तमान काळामध्ये ही स्थळे पाकिस्तानात आहेत. तक्षशिलामधे पांडवांचा वंशज जनमेजय याने, त्याचा पिता परीक्षित याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने क्रोधीत होऊन सर्पयज्ञ योजिला. या यज्ञामुळे हजारो सर्प जळून भस्म झाले असल्याची कथा पुराणांमध्ये आहे.
mahabharat1
महाभारतामध्ये उल्लेखलेले उज्जनिक हे स्थळ वर्तमान काळात उत्तराखंड राज्याच्या उधमसिंह नगर जिल्ह्यामध्ये काशीपुरमध्ये आहे. याच ठिकाणी गुरु द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडवांना युद्धनीतीचे धडे दिले असल्याचा उल्लेख आहे. आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा देण्यासाठी पांडवांनी ह्या ठिकाणी सरोवराचे निर्माण केले असून या सरोवराला द्रोणासागर सरोवर या नावाने ओळखले जाते. पांडवांना जीवे मारण्याच्या उद्देशाने दुर्योधनाने बनविलेले लाक्षागृह असलेले वारणावत हे ठिकाण वर्तमानकाळामध्ये बागपत या ठिकाणी आहे. वारणावत आपल्याला कौरवांनी द्यावे अशी मागणी पांडवांनी वारंवार करूनही दुर्योधनाने त्यांची मागणी अमान्य केली होती.
mahabharat2
सोळा पौराणिक महाजनपदांपैकी एक असलेल्या पांचाल या ठिकाणाचा उल्लेखही महाभारतामध्ये आढळतो. हे स्थळ हिमालय आणि चंबा नदीच्या मध्ये असावे असा अंदाज व्यक्त केला गेला होता. पण वर्तमान काळामध्ये इतिहासकारांच्या मतानुसार हे स्थळ पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये बरेली, बदायु, आणि फरुखाबाद जिल्ह्यांच्या परिसरामध्ये असल्याचे म्हटले जाते. पांचाल प्रदेशाचे राजे दृपद यांची कन्या द्रौपदी पांडवांची पत्नी होती.
महाभारतामध्ये इंद्रप्रस्थ आणि खांडवप्रस्थ यांचाही उल्लेख आढळतो. ही स्थळे म्हणजे वर्तमान काळातील भारताची राजधानी दिल्ली आहे. महाभारतकालीन ही ठिकाणे यमुना नदीच्या तीरावर असल्याचा उल्लेख असून धृतराष्ट्राकडून अर्धे राज्य दिले गेल्यानंतर पांडवानी इंद्रप्रस्थ येथे आपली राजधानी स्थापिली होती.
mahabharat3
सूर्यपुत्र कर्ण याला अंगदेशाचे राज्य दुर्योधनाने दिले होते. तत्कालीन अंग प्रदेश बिहार राज्यातील भागलपूर आणि मुंगेर जिल्ह्यांमध्ये अस्तित्वात होते अशी मान्यता आहे. तसेच महभारतातील एका कथेमध्ये भीम आणि हनुमानाची भेट झाल्याचा उल्लेख आहे. हे स्थान वर्तमान काळामध्ये उत्तराखंड राज्यातील जोशीमठ या ठिकाणापासून २५ किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणाला ‘हनुमान चट्टी’ या नावाने ओळखले जाते. ज्या ठिकाणी कौरव आणि पांडवांचे युद्ध झाले ते कुरुक्षेत्र सध्याच्या काळामध्ये अंबाला, यमुनानगर, आणि कथैल प्रांताच्या परिसरामध्ये असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment