लोकसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

election1
मुंबई : चार टप्प्यातील मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून मतदारांनी मतदान करावे म्हणून राज्यात ११ एप्रिल १८ एप्रिल, २३ एप्रिल आणि २९ एप्रिलला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अर्थात चारही दिवस सरसकट सुट्टी नाही. तर मतदान ज्या दिवशी आहे, त्या भागात फक्त त्या दिवशीच सुट्टी मिळणार आहे. पण महत्त्वाचे म्हणजे १८ एप्रिल या मतदानाच्या तारखेआधी १७ एप्रिलला महावीर जयंती आहे. तर १९ एप्रिलला गुड फ्रायडेची सुट्टी आहे आणि त्यानंतर शनिवार रविवार आहे. तर २९ एप्रिलला सोमवार असून त्याच्या आधी शनिवार-रविवार आहे. १८ आणि २९ एप्रिल या दोन मतदानाच्या तारखा सुट्ट्यांना लागून आहेत.

शाळा-महाविद्यालयांच्या सुट्ट्याही त्याचदरम्यान सुरू होत आहेत. पण मतदानाच्या तारखांदरम्यान कृपया बाहेर फिरायला जायचे ठरवू नका. मतदानाची ही सुट्टी मतदानासाठी आहे. सहलीसाठी नाही. महाबळेश्वर, गोवा, केरळ, सिमला-कुलू मनाली, अगदी युरोप. ही सहलीची ठिकाणे आहे तिथेच राहणार आहेत. कधीही तिथे जाता येईल. पण पाच वर्षांनी एकदा येणारा मतदानाचा मुहूर्त चुकवलात तर मात्र पुढची पाच वर्षं तुम्हाला कोणालाही बोलण्याचा अधिकार राहणार नाही.

Leave a Comment