
एखाद्या घरात कुणाचे लग्न असले की त्यात घरात लगबग, गोंधळ, खरेदी, मानपान या सर्व गोष्टी सुरुच असतात. पण सध्याच्या युगात लग्नाआधीच्या प्री-वेडिंग शूटचीही फॅड वाढीला आले आहे. पण त्यासाठी करावी लागणारी तयारी आणि त्यातून होणारा गोंधळ ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अशा या चित्रपटाचा धमाल ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
सलील कुलकर्णीच्या ‘वेडिंगचा शिनेमा’चा ट्रेलर रिलीज
‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातून संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी हे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर आणि पहिले गाणं रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली होती.
लग्नाची लगबग या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही पाहायला मिळते. मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह डॉ. सलील कुलकर्णी यांनीच कथा, पटकथा, संवाद आणि संगीताची धुरा सांभाळली आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची निर्मिती असलेला ‘वेडिंगचा शिनेमा’ १२ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
