विजय माल्ल्याचे शेअर्स विकण्यास पीएमएलए न्यायालयाची मंजुरी

vijay-mallya
नवी दिल्ली – देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेल्या विजय माल्ल्याचे 1 हजार कोटींचे शेअर्स विकण्यास मनी लाँडरिंग कायदा प्रतिबंध (पीएमएलए)न्यायालयाने मंजुरी दिली आहे. माल्ल्याचे युनायटेड ब्रेवरेज (यूबीएल)मध्ये शेअर्स आहेत. जे विकण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. विजय माल्ल्याने या शेअर्सची विक्री रोखण्यासाठी याचिका दाखल केली होती. बीएसईमध्ये युनायडेट ब्रेवरेजचे शेअर्स 1 टक्क्याच्या वाढीने 1370 रुपयांवर पोहोचले आहेत. कर्जवसुली प्राधिकरणाने या महिन्यात न्यायालयाद्वारे नियुक्त केलेल्या लिक्विडेटरकडे हे शेअर्स वळते केले होते. मनी लाँड्रिंगअंतर्गत माल्ल्याच्या विरोधात चौकशी करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने ते शेअर्स जप्त केले होते.

शेअर्सच्या विक्रीवर प्रतिबंध घालणारी याचिका न्यायालयाने फेटाळली होती. न्यायमूर्ती युनायडेट ब्रेवरेज होल्डिंग्सच्या याचिकेवर सुनावणी करताना म्हणाले होते की, शेअर्सच्या विक्रीवर प्रतिबंध आणता येणार नाही. 1 हजार कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकण्यास प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट(पीएमएलए) न्यायालयाने परवानगी दिली आहे. माल्ल्याची जप्त केलेली संपत्ती विकण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. 11 मार्चला कर्जवसुली प्राधिकरणाच्या बंगळुरूच्या खंडपीठाने माल्ल्याला शेअर विकण्यासंदर्भातील नोटीस बजावली होती. विजय माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या 6203.35 कोटी रुपयांच्या कर्जाच्या वसुलीसाठी हे केले जात आहे. माल्ल्यावर व्याज आणि दंड मिळून बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज आहे.

Leave a Comment