लोकसभा : ‘हे’ नेते आहेत काँग्रेसचे स्टार प्रचारक

congress
मुंबई – महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून सोनिया गांधीसह यामध्ये प्रियंका गांधींचाही समावेश आहे. तसेच राज्यात खासदार अशोक चव्हाण, त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

११ एप्रिल आणि १८ एप्रिलला महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे. हे स्टार प्रचारक या निवडणुकीत प्रचार करणार आहेत. काँग्रेसकडून विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील अनेकांच्या प्रतिक्रियांमुळे दुखावले गेले. त्यामुळेच नगरमध्ये प्रचाराला जाणार नसल्याचे विधानही विखे पाटलांनी केले होते. पण आता स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये काँग्रेसने त्यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्यामुळे आता विखे पाटील प्रचार करणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

स्टार प्रचारकांची यादीमध्ये अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, विलास मुत्तेमवार, राजीव सातव, अमिता चव्हाण राज्यातील या नेत्यांचा समावेश आहे.

Leave a Comment