हे आहे खास अब्जाधीशांसाठी प्रायव्हेट आलिशान विमानतळ

airport
आजकालच्या धावत्या युगामध्ये वेळेचे महत्व वाढले आहे. एकेका मिनिटाला लाखमोलाची किंमत आहे. म्हणूनच प्रवास कामानिमित्त करायचा असो, किंवा सुट्टीनिमित्त, प्रवासामध्ये जास्त वेळ न घालवता जिथे जात आहोत तिथे जास्त वेळ देण्याकडे कल वाढलेला दिसतो. हीच गोष्ट विचारामध्ये घेऊन केवळ भारतामध्येच नाही, तर जगभरातील नागरिकांची विमान प्रवासाला अधिक पसंती मिळत असते. अमेरिकेतील लॉस एंजिलीस शहरही याला अपवाद नाही. मात्र नाण्याला दोन बाजू असतातच. विमान प्रवास हा वेळ वाचविणारा ठरत असला, तरी येथे पोहोचल्यावर कस्टम्स, सिक्युरिटी साठी लांबलचक रांगा, सामान ‘चेक-इन’ करण्यासाठी असलेली गर्दी आणि विमान ‘बोर्ड’ करण्यासाठी करावी लागणारी पायपीट, किंवा क्वचित धावपळ यामध्ये यात्रेकरूंची मात्र चांगलीच दमछाक होत असते.
airport1
जगभरातील धनाढ्य मंडळींना मात्र आता या धावपळीतून सुटका करून घेता येणे शक्य झाले आहे. लॉस एंजिलीस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता २०१७ सालापासून आलिशान टर्मिनल सुरु करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय उड्डाणे करणाऱ्या यात्रेकरूंसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेच्या अंतर्गत यात्रेकरूंना चार हजार डॉलर्सच्या मोबदल्यात उत्तम सुरक्षा प्रावधान असलेला आणि सर्व सोयींनी परिपूर्ण असा आलिशान ‘सुईट’ उपलब्ध करून देण्यात येतो. अशा प्रकारचे सुईट असणारे हे विशेष टर्मिनल तयार केले गेले असून, या टर्मिनल पासून विमान ‘बोर्ड’ करण्यासाठी येथे थांबणाऱ्या यात्रेकरूंना सामान्यपणे प्रवास करताना कोणत्याही अडचणीला तोंड द्यावे लागू नये अशा बेताने हे टर्मिनल तयार करण्यात आले आहे.
airport2
दर वर्षी जगभरातील अनेक धनाढ्य व्यापारी आणि सेलिब्रिटीज या टर्मिनलमधील आलिशान ‘सुईट’चा लाभ घेत असून, दोन उड्डाणांच्या मधल्या वेळामध्ये (ट्रान्झिट टाईम) येथे विश्रांती घेऊ शकतात. या संपूर्ण टर्मिनल मध्ये बारा खासगी, अतिशय आलिशान ‘सुईट’ असून, जगभरातील सात एअरलाईन्सच्या वेळापत्रकानुसार हे सुईट उपलब्ध केले जात असतात. विमानांमधून यात्रेकरूंना या टर्मिनलमध्ये आणण्यासाठी बीएमडब्ल्यू गाड्यांचा ताफा तैनात असतो. या खासगी टर्मिनलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था केली गेली आहे. इथे येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी आठ कर्मचाऱ्यांची टीम तैनात असून, पाहुण्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जाण्याची आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू न देण्याची जबाबदारी या टीमची असते. यात्रेकरूंचे बॅगेज चेकइन करण्यापासून त्यांच्या पुढच्या फ्लाईट साठी त्यांना वेळेवर विमानामध्ये बसविण्यापर्यंत सर्व गोष्टींची खबरदारी ही टीम घेत असते.
airport3
टर्मिनलमध्ये प्रवेश केल्यानंतर पाहुण्यांना सरळ त्यांच्या खासगी सुईटमध्ये नेले जाते. प्रत्येक सुईट एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान सुईट इतका आरामदायक आहे. प्रत्येक सुईटमध्ये एक लहानसे ‘किचनेट’ दिलेले असून, यामध्ये अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ, पेये उपलब्ध करविलेली असतात. पाहुण्यांना आपल्या आवडीप्रमाणे भोजन आधीपासूनच ऑर्डर करून ठेवण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे. पाहुण्यांना आवडणारे हर तऱ्हेचे मद्य आणि इतर पेयेही इथे उपलब्ध करविली जातात. सर्व सोयींनी उपलब्ध स्नानगृहही या सुईटमध्ये आहे. त्याचप्रमाणे पाहुण्यांना हवे असल्यास स्पा, मसाज रूम, आणि केस कापण्यासाठी ब्युटी सॅलॉन देखील या टर्मिनलमध्ये उपलब्ध आहे. मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जर्स, आणि अडाप्टर्सही या ठिकाणी उपलब्ध करविले गेले आहेत. काही सुईट्सच्या मागील मोकळ्या अंगणामध्ये गोल्फ खेळण्याची सुविधाही गोल्फ शौकिनांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुढील विमान प्रवासाची वेळ होताच येथील कर्मचाऱ्यांच्या वतीने पाहुण्यांना सूचित केले जात असून, सामान चेकइन करणे किंवा इतर तत्सम औपचारिकतांमध्ये वेळ वाया न दवडता यात्रेकरूंना बीएमडब्ल्यूमध्ये बसवून त्यांना त्यांच्या विमानापर्यंत पोहोचविण्यात येते. हे टर्मिनल येथे येणाऱ्या पाहुण्यांचा प्रवासाचा अनुभव अविस्मरणीय असावा याची खबरदारी घेत असून, या टर्मिनलचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी वेगळी कंट्रोल रूमही येथे तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे प्रत्येक यात्रेकरू या टर्मिनलमध्ये आल्यापासून येथून बाहेर पडेपर्यंत सर्व व्यवस्था या कंट्रोल रूम द्वारे नियंत्रित केली जात असते.

Leave a Comment