आपल्या शरीरास आवश्यक तेवढे पाणी आपण पीत आहात का?


आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्याकरिता आपल्या शरीरास साधारण आठ ते दहा ग्लास पाण्याची दैनंदिन आवश्यकता असते. पाण्यामुळे शरीरामधील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात, त्वचा आणि केस निरोगी आणि सतेज राहण्यास मदत मिळते. जेव्हा आपल्या शरीराला पाण्याची गरज असते तेव्हा आपला मेंदू तसा संकेत पाठवत असतो आणि त्यावेळेला तहान लागण्याची भावना होऊन पाणी प्यायले जाते. पाणी हे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास ही मदत करते. पण जर पुरेसे पाणी शरीराला मिळत नसेल तर त्याचे दुष्परिणामही जाणवू लागतात. जर का हे दुष्परिणाम आपल्याला जाणवू लागले तर आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता आहे असे समजावे आणि पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.

जर का आपल्याला दिवसभर थकवा जाणवत असेल, तर याचे कारण शरीरामध्ये पाण्याचे कमी झालेले प्रमाण असणे, हे असू शकते. सतत जाणवणारा थकवा दूर करण्याकरिता चहा, कॉफी किंवा कोल्ड्रिंक घेणे टाळावे. त्याऐवजी वेळोवेळी थोडे थोडे पाणी पीत राहावे. साधारणतः सकाळी उठल्यानंतर शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी झाल्याचे जाणवते. त्यमुळे सकाळी उठल्यावर लगेचच एक ग्लास पाणी प्यावे, या मुळे आपल्या शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होईल.

आपल्या शरीराची पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्यास मलावरोधाची तक्रार उद्भवू शकते, तसेच डोकेदुखीचाही त्रास होऊ शकतो. अश्या वेळेला या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता थोडे थोडे पाणी सतत पीत राहण्याने या तक्रारी दूर होण्यास मदत मिळेल.

शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी झाल्यास डोळे कोरडे पडणे किंवा श्वासास दुर्गंधी येणे अश्या तक्रारी उद्भवतात. अश्या वेळी पाणी पिण्याचे प्रमाण वाढविल्याने या तक्रारी दूर होतात. पुष्कळदा दिवस भराच्या कामानंतर हलकी अंगदुखी किंवा सांधे दुखी सुरु होते. विशेषतः शारीरिक श्रम करणाऱ्यांना पायात गोळे येणे किंवा स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येणे यासारखे प्रकार घडू शकतात. या तक्रारी दूर करण्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे.

जेवण झाल्यानंतर देखील भूकेची भावना होत असेल, तर हे ही शरीरामध्ये पाणी कमी असण्याचे लक्षण असू शकते. अश्या वेळी काही खाणे टाळून, पाणी प्यावे. या मुळे शरीरामध्ये निर्माण झालेली भूकेची भावना शमेल, तसेच खाल्लेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment