ताश्कंदचा ट्रेलर रिलीज, ५३ वर्षांनी उलगडणार शास्त्रींच्या मृत्यूचे गूढ

tashkand
भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्कंद येथे अचानक मृत्यू झाला होता आणि या मृत्यूचे गूढ आजही कायम आहे. या घटनेला ५३ वर्षे उलटली असून आता याच विषयावर येत असलेल्या द ताश्कंद फाईल्स या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. बॉलीवूड मध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या आयुष्यावरचे चित्रपट अलीकडच्या काळात बनले आहेत मात्र ताश्कंद या सर्वाहून वेगळा असेल असे ट्रेलरवरून प्रतीत होत आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी हा चित्रपट तयार केला असून त्यात शास्त्रीजींच्या मृत्यूशी संबंधित अनेक मुद्दे घेतले गेले आहेत. भारत आणि पाकिस्तान याच्यात १९६५ झाली झालेल्या युद्धानंतर युद्ध समाप्तीच्या करारावर सह्या करण्यासाठी शास्त्री ताश्कंद येथे गेले होते. या करारावर त्यांनी सही केली आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी त्यांचा अचानक मृत्यू झाला. तो नक्की कशामुळे, त्यांची हत्या झाली काय हे कोडे आजही कायम आहे. विशेष म्हणजे शास्त्रींच्या मृत्यूनंतर तपास कमिटी नेमली गेली नव्हती. मात्र ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचे जाहीर केले गेले होते.

शास्त्री यांच्या कुटुंबीयानी अनेकदा या संदर्भातल्या फाईल सार्वजनिक कराव्या अशी मागणी केली होती पण अजून तरी ती मान्य झालेली नाही. ताश्कंद फाईल्स मध्ये मिथुन चक्रवर्ती, नसिरुद्दीन शाह, पल्लवी जोशी, पंकज त्रिपाठी, विनय पाठक, मंदिरा बेदी असे अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट १२ एप्रिल रोजी रिलीज होत आहे.

Leave a Comment