शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स वाढवणार हवाई दलाचे सामर्थ्य

chinook
नवी दिल्ली – आजपासून भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अमेरिकन बनावटीचे CH-47F (I) चिनुक ही शक्तीशाली हेलिकॉप्टर्सचा समावेश झाला आहे. या हेलिकॉप्टर्सचे चंदिगडच्या एअऱ फोर्स स्टेशनवरील बेस रिपेअर डिपोट (3-BRD) येथे एका कार्यक्रमाद्वारे राष्ट्रार्पण झाले. भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य या हेलिकॉप्टर्समुळे आणखी वाढले आहे.

हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ, वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ (एओसी-इन-सी) एअर मार्शल आर. नांबियार यांनी चिनुकच्या या राष्ट्रार्पण कार्यक्रमासाठी हजेरी लावली. पण देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण या उपस्थित या कार्यक्रमासाठी राहिल्या नाहीत.

आज पहिल्या खेपेतील चार चिनुक हेलिकॉप्टर्सचे राष्ट्रार्पण झाले. भारतीय सैन्याला प्रत्यक्ष लढाईच्या वेळी आणि इतर वेळी सैन्याच्या पथकांना एका जागेवरुन दुसऱ्या जागी वाहून नेण्यासाठी ही चार अॅडव्हान्स डबल रोटर हेलिकॉप्टर्स उपयोगात येणार आहेत. चंदीगडच्या 3-BRD येथे या विमानांची पहिली खेप जोडणीसाठी दाखल झाली आहे. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार हवाई दलाला अशी १५ हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत.

सध्या भारताकडे अति उंचीवर अधिक अवजड सामग्री वाहून नेण्यासाठी रशियन बनावटीचे Mi-26 ही हेलिकॉप्टर्स सेवेत आहेत. त्यानंतर आता चिनुकचीही यात भर पडणार आहे. १९८६पासून हवाई दलाकडे चंदीगडच्या 3-BRDमध्ये ४ Mi-26 हेलिकॉप्टर्स आहेत.

Leave a Comment