असा आहे छपाकमध्ये दीपिकाचा लूक

chappak
रणवीर सिंहसोबत लग्न झाल्यानंतर दीपिका पादुकोण आता पुन्हा एकदा नव्या इनिंगसाठी तयार झाली आहे. यावेळी ती आपल्यासमोर एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत येणार आहे. दिग्दर्शिका मेघना गुलजार या अॅसिड हल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ हा चित्रपट बनवत असून या चित्रपटात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिका पादूकोण दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील तिचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो दीपिका पादुकोण हिने शेअर केला आहे. या चित्रपटात साकारत असलेली मालतीची भूमिका ही माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असल्याचे म्हणत हा फोटो दीपिकाने शेअर केला आहे.


अभिनेता विक्रांत मेस्सीला मेघना गुलजार यांच्या या चित्रपटात दीपिकासोबत काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. विक्रांतने आतापर्यंत अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. त्यानंतर आता तो छपाक चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मीचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तसेच अॅसिड हल्यानंतर मालती उर्फ दीपिकाला करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर ओढावणाऱ्या संकटांवर मात करुन ती अखेर सुखी आयुष्य जगते हे दाखवण्यात आले आहे. छपाक हा चित्रपट १० जानेवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment