‘बलोच’मध्ये महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार प्रवीण तरडे

baloch
सध्या कलाविश्वामध्ये इतिहासाच्या आठवणी जाग्या करण्यासाठी अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होत आहे. अशा अनेक चित्रपटांची निर्मिती बॉलिवूडमध्ये झाली असून आता हा ट्रेंड हळूहळू मराठी सिनेसृष्टीतही येऊ लागला आहे. पानिपतची लढाई आपल्या सगळ्यांच माहित आहे. पण लवकरच या लढाईनंतरची परिस्थिती कशी होती याचा उलगडा होणार आहे. पानिपतच्या लढाईनंतरच्या वास्तवावर प्रकाश पवार दिग्दर्शित ‘बलोच’ या चित्रपटात भाष्य करण्यात येणार आहे.
baloch1
जून महिन्यात जीवन जाधव आणि जितेश मोरे निर्मित या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु होणार असून राजस्थानमध्ये पहिले टप्प्याचे चित्रिकरण पार पडणार आहे. या चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले. पानिपतचा पराभव मराठ्यांच्या इतिहासातील मोठी जखम, आपल्या मावळ्यांना त्या पराभवानंतर बलुचिस्तानात गुलामगिरीत राहावे लागले. ‘बलोच’ चित्रपट म्हणजे त्या गुलामांची शौर्यगाथा असल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले. दिग्दर्शक म्हणून प्रकाश पवार यांचा हा तिसरा चित्रपट आहे.

दरम्यान अभिनेता प्रवीण तरडे यांची या चित्रपटामध्ये महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे हेदेखील स्क्रीन शेअर करणार असून प्रवीण तरडे आणि भाऊराव कऱ्हाडे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

Leave a Comment