महाभारतातील असे काही तथाकथित शाप ज्यांचा प्रभाव आजही दिसून येतो

mahabharat
महाभारत हा आजवरच्या पौराणिक व साहित्यिक इतिहासातील सर्वात मोठा आणि रोचक ग्रंथ मानला गेला आहे. धर्माच्या रक्षेसाठी भावा-भावांमध्ये झालेले मतभेद आणि अखेरीस युद्ध या घटनांशी निगडीत महाभारतातील अनेक कथा आजही प्रसिद्ध आहेत. मात्र महाभारतातील काही कथांमध्ये केल्या गेलेल्या भविष्यवाणी, किंवा दिले गेलेले तथाकथित शाप आजच्या काळामध्ये सत्यात उतरत असल्याचे म्हटले जाते. या कथा कोणत्या ते जाणून घेऊ या.
mahabharat1
‘बायकांच्या पोटामध्ये कोणतेही रहस्य लपून राहू शकत नाही’, या विधानाचा थेट संबंध महाभारतातील एका घटनेशी असल्याचे म्हणतात. महाभारताचे युद्ध संपुष्टात आल्यानंतर कर्ण हा वास्तविक कुंती पुत्र असल्याचे कुंतीने पांडवांना सांगितले. हे ऐकून अतिशय कष्टी झालेल्या पांडवांना आपण आपल्याच भावाचा वध केल्याचे दुःख अनावर झाले. त्यानंतर युधिष्ठिराने कर्णाचे विधिवत अंत्यसंस्कार केले आणि कुंतीने आपल्यापासून सत्य लपविल्याच्या क्रोधापायी, व बंधूवियोगाच्या दुःखापायी, त्याने केवळ कुंतीलाच नाही, तर समस्त स्त्रीजातीलाच शाप दिला. इथून पुढे कोणतीही स्त्री आपल्याजवळ कुठलेही गुपित ठेऊ शकणार नाही, कोणतेही रहस्य ती दीर्घकाळ आपल्या मनामध्ये लपवून ठेऊ शकणार नाही, असा तो शाप होता.
mahabharat2
पांडव स्वर्गलोकी प्रस्थान करण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी सर्व राज्य अभिमन्यूचा पुत्र परिक्षित याच्या स्वाधीन केले. एकदा परीक्षिताने तपासाठी बसलेल्या शमिक मुनींच्या गळ्यामध्ये चेष्टा म्हणून, मेलेला नाग घातला. ही गोष्ट शमिक-पुत्र शृंगी यांना समजताच त्यांच्या क्रोधाला सीमा राहिली नाही. मुनींच्या गळ्यामध्ये मेलेला नाग घालून त्यांचा अपमान करणाऱ्या परीक्षिताचा सर्पदंशाने मृत्यू होईल आणि त्यानंतर पृथ्वीवर कलियुगाचा आरंभ होईल असा शाप त्यांनी परिक्षिताला दिला. या शाप सत्यात उतरला आणि तक्षक नाग डसल्याने परिक्षिताला मृत्यू आला. परीक्षित वास्तविक अतिशय कर्तव्यपरायण आणि धर्मप्रिय राजा होता, पण त्याच्या मृत्यूनंतर सगळीकडे अराजकता माजली आणि तेव्हापासून पृथ्वीवर कलियुगाचे आगमन झाल्याची कथा आहे.
mahabharat3
महाभारताच्या युद्धामध्ये द्रोणाचार्य-पुत्र अश्वत्थामाने आपल्या अस्त्राची दिशा बदलून अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भाच्या दिशेने केली. त्याच्या या कृत्याबद्दल श्रीकृष्णाने त्याला शाप दिला आणि पुढील काही हजार वर्षे तो पृथ्वीवर भटकत राहील, व त्याला मुक्ती मिळणार नाही असा शाप दिला. आजही मध्य प्रदेशातील असिरगढ येथील शिवमंदिरामध्ये दररोज अश्वत्थामा पूजेसाठी येत असल्याची आख्यायिका आहे. हे मंदिर रात्रीच्या वेळी कुलूपबंद करूनही दुसऱ्या दिवशीपहाटे मंदिर उघडल्यानंतर येथे नित्यपूजा केलेली आढळते. तसेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासींना देखील कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये अश्वत्थामा दर्शन देत असल्याचे ही म्हटले जाते.

Leave a Comment