बेगुसराय येथून लोकसभा निवडणूक लढवणार कन्हैया कुमार – भाकप

kanhaiya-kumar
पाटणा – मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली जागावाटपाची यादी बिहारच्या महाआघाडीने शुक्रवारी जाहीर केली. पण भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (भाकप) या यादीमध्ये एकही जागा देण्यात न आल्यामुळे महाआघाडीत विद्यार्थी नेता कन्हैया कुमार नाही हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानंतर बेगुसरायमधून कन्हैया कुमार लोकसभा निवडणूक लढवणार, असे म्हटले जात आहे.

भाकपने महाआघाडीमध्ये जागावाटप झाल्यानंतर रविवारी बैठक बोलावली आहे. भाकप उमेदवारांची यादी या बैठकीमध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) माजी विद्यार्थी संघचा प्रमुख कन्हैया कुमारची उमेदवारीही जाहीर होऊ शकते.

बिहारच्या बेगुसराय येथून कन्हैया कुमार निवडणूक लढवणार हे आधीच जाहीर झाले होते. पण भाकप महाआघाडीमध्ये असणार का यावर प्रश्नचिन्ह लागले होते. महाआघाडीने शेवटी जागावाटप जाहीर केल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झाले. रविवारी होणाऱ्या बैठकीमध्ये मधुबनी, मोतीहारी, बांका आणि खगडिया या मतदार संघासाठी भाकप उमेदवार घोषित करणार आहे.

बेगुसराय येथून कन्हैया कुमार निवडणूक लढल्यास ही लढत त्रिकोणीय होण्याची शक्यता तयार झाली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महाआघाडीतील पक्षांनी बिहारच्या ४० जागा वाटून घेतल्या आहेत. त्यामध्ये २० जागांवर राष्ट्रीय जनता दल तर ९ जागांवर काँग्रेस लढणार आहे.

Leave a Comment